Sachin Waze Case: काँग्रेसच्या नेत्याचाच शिवसेनेला कोंडीत पकडणारा प्रश्न

uddhav-thackeray-sad
uddhav-thackeray-sad

मुंबई: महाराष्ट्रात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणाची सध्या संपूर्ण राज्यभर चर्चा आहे. सुरुवातीला या प्रकरणात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली झाली. पण राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपासाची सूत्र हाती घेतल्यावर सचिन वाझेंना अटक झाली आणि त्यांचे निलंबन झाले. या प्रकरणावरून विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण अखेर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली. या प्रकरणी 'सामना'तून परमबीर सिंह यांची पाठराखण करण्यात आली होती. त्यावर काँग्रेस नेत्यानेच शिवसेनेला कोंडीत पकडणारा सवाल उपस्थित केला.

"शिवसेना पोलीस आयुक्त (पदावरून हटवण्यात आलेल्या) परमबीर सिंह यांचा जयजयकार करत आहे. राज्याचे गृहमंत्री, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे आहेत, ते काल म्हणाले की पोलीस आयुक्तांनी चूक केली होती. अशा प्रकाराची परस्पर विरोधी विधाने सरकारची प्रतिमा अधिकच मलीन करतील. वाझे कांड याबद्दल आतापर्यंत इतकंच समजलं आहे की हे सत्ता प्रायोजित हफ्ता वसूली कांड आहे. याचा संबंध शिवसेनेशी आहे का?", असा अडचणीत आणणारा प्रश्न काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला.

सचिन वाझे प्रकरणात महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर टीका होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे पोलीस दलात बदल करण्यात आले. रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली. खुद्द गृहमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यावर हेमंत नगराळे यांनी काही महत्त्वपूर्ण विधाने केली. "मुंबई पोलिसांसाठी सध्या कठीण काळ सुरू आहे. या कठीण काळात राज्य सरकारने माझ्यावर एक जबाबदारी सोपवली आहे. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे, ती सुधारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या सुधारणेमध्ये मला कॉन्स्टेबल ते आयुक्तांपर्यंत साऱ्यांचं सहकार्य हवं आहे. त्याचसोबत सर्व जनतेनेही आम्हाला सहकार्य करावं, अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्र व मुंबई पोलिसांवर कोणतीही टीका होणार नाही, यासाठी साऱ्यांच्या सहकार्याने आम्हाला पोलीस दलांत आवश्यक त्या सुधारणा करायच्या आहेत", अशी भूमिका मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com