Mumbai News | सुरक्षित रस्ते, सुरक्षित शाळा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Safe roads safe schools mumbai municipality safe school zones in 200 places

सुरक्षित रस्ते, सुरक्षित शाळा!

मुंबई : मुंबईतील मुलांसाठी ‘सुरक्षित रस्ते आणि सुरक्षित रहदारी’ या सेफ स्कूल झोनच्या माध्यमातून मुंबईतील २०० शाळांची निवड करण्यात आली आहे. येत्या वर्षभरात या शाळांच्या ठिकाणी सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे. या उपक्रमांतर्गत मुलांना शाळेत येण्यासाठी सुरक्षित रस्ते उपलब्ध करण्याबरोबरच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, हे उद्दिष्ट आहे.

‘सेफ स्कूल झोन’ हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर भायखळ्यात सुरू झाला होता. महापालिका आणि वाहतूक पोलिस यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), इंडिया रॉस सेंटर यांच्या भागीदारीने भायखळा येथील मिर्झा गालिब मार्गावर शहरातील पहिला ‘सेफ स्कूल झोन’ प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला. हा प्रकल्प ‘ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ यांच्यातर्फे हाती घेण्यात आला आहे. मुंबईत बालक-स्नेही आणि चालण्याजोगे स्कूल झोन तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. रस्ता वापरकर्त्यांसाठी, विशेषतः मुलांसाठी चालण्याजोगा, विनाअडथळा, सुरक्षित आणि अधिक चैतन्य निर्माण करणारा ‘डिझाईन सोल्यूशन्स’ या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. २०० शाळांमध्ये हा ‘सेफ स्कूल झोन’ राबविण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षात हा प्रकल्प मुंबईभरात राबविण्यात येणार आहे.

सर्वेक्षणात काय आढळले?

डब्ल्यूआरआय इंडियाच्या सस्टेनेबल सिटीज आणि ट्रान्सपोर्ट सर्वेक्षणात जवळपास ५७ टक्के पालकांनी त्यांच्या मुलांच्या शाळेच्या परिसरातील रस्ते मुलांच्या दृष्टीने सुरक्षित नाहीत, असे सांगितले. यासाठी चांगल्या दर्जाचे पदपथ नसणे आणि वाहनांची गर्दी असणे हे घटक कारणीभूत आहेत. ‘मुलांची उंची, आकलनक्षमता आणि धोका ओळखण्याची क्षमता ही प्रौढांच्या तुलनेने कमी असल्यामुळे मुलांना जास्त धोका असतो. योजनेमध्ये चाईल्ड फ्रेंडली, सुरक्षित रस्ता असेल, जो त्यांचा शाळेत येण्या-जाण्याचा प्रवास आरामदायी व आनंददायी करणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

अशी आहे सेफ झोनची रचना

मुंबई वाहतूक पोलिस, महापालिका, शहरातील रस्ते तज्ज्ञ आणि स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन रंग, बॅरिकेट्स आणि कोन्सचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला. डिझाईन सोल्यूशनमध्ये माहिती फलकांचा वापर करून स्कूल झोन्सची आखणी करणे, रस्त्यांवर खुणा करणे, चालण्यासाठी व वाट पाहण्यासाठी निश्चित भाग नियुक्त करणे, पिक-अप झोन, ड्रॉप झोन निश्चित करणे, खेळण्यासाठी चाईल्ड फ्रेंडली घटकांचा अंतर्भाव करणे आणि पादचाऱ्यांसाठी ठळक क्रॉसिंग आखणे याचा यामध्ये समावेश आहे. कमी खर्चाच्या साहित्याचा वापर करून केलेल्या या प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाविषयी या परिसरातील नागरिकांकडून प्रतिक्रिया घेण्यात येतील आणि त्यानंतरच हे बदल कायमस्वरूपी करण्यात येतील.

यापूर्वीचा अपघात

ई वॉर्डमधील (भायखळा) मिर्झा गालिब मार्गावर ख्राईस्ट चर्च स्कूल आणि सेंट अॅग्नेस हायस्कूल या दोन शाळा आहेत. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत चर्चच्या परिसरातील ५०० मीटरच्या परिघात २३ अपघात झाले आणि ३ मृत्यू झाले. यात दोन मुलांचाही समावेश होता. घरी परत जाताना झालेल्या अपघातात विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते.

प्रकल्पातील सर्वेक्षण

ख्राईस्ट चर्चच्या परिसरात शाळेतील विद्यार्थ्यांना काय पाहायला आवडेल, हे जाणून घेण्यासाठी ऑक्टोबर २०१९ मध्ये ‘डब्ल्यूआरआय इंडिया’ने विद्यार्थ्यांसोबत एक कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये त्यांना काय आवडते/आवडत नाही हे जाणून घेण्यासाठी शाळेच्या परिसरात फेरीही काढली. या अंतर्गत मुलांना रस्त्यावर आवडणारे घटक समाविष्ट करायचे होते. त्याचप्रमाणे प्रवास कशा प्रकारे केला जातो, मुलांचा प्रवासात जाणारा वेळ आणि त्यांच्यासमोरील आव्हाने जाणून घेण्यात आली.

मुंबईत पहिल्या टप्प्याअंतर्गत २०० ठिकाणी सेफ स्कूल झोन तयार करण्यात येणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात सुरक्षित पद्धतीने शाळेच्या ठिकाणी प्रवेश मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.

- अजित कुंभार, सहआयुक्त