मुंबई - मराठी साहित्य विश्वात अत्यंत मोलाची ग्रंथसंपदा प्रसिद्ध करून ती मराठी भाषा प्रेमींना उपलब्ध करून देण्याची परंपरा आपल्या स्थापनेपासून जतन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा तब्बल ५१ नवीन पुस्तकांचा खजिना मराठी भाषिकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
२७ फेब्रुवारी या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबईतील गेटवे येथे होणाऱ्या कार्यक्रमात संशोधन, इतिहास, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, चरित्र आदी विविध विषयांतील या नव्या ग्रंथांचे प्रकाशन होणार असल्याची माहिती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील यांनी दिली.
मंडळाच्या स्थापनेनंतर मागील काही वर्षांत खूप मोठ्या प्रमाणावर मंडळाकडून विविध विषयांवरील साहित्यसंपदेचे प्रकाशन करून ते अगदी अल्पदरात आणि मंडळाच्या संकेतस्थळांवर त्याची पीडीएफ प्रत मोफत उपलब्ध करून देण्याचा एक पायंडा सुरू ठेवला आहे. आत्तापर्यंत मंडळाने ‘पुस्तक प्रकाशन’ या मुख्य उद्दिष्टानुसार 697 ग्रंथ प्रकाशित केले. यावर्षीदेखील अत्यंत मौलिक अशा वर्षभरात सिद्ध झालेल्या नव्या 51 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी केले जाणार आहे.
यंदा प्रकाशित होणाऱ्या 51 ग्रंथांमध्ये रमेश वरखेडे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास खंड 3 (1951-2010)’ या तिसऱ्या खंडाचे तसेच ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्रमालेअंतर्गत रामदास भटकळ यांनी लिहिलेले विष्णू नारायण भातखंडे यांचे चरित्र मंडळ प्रकाशित करीत आहे. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ यांच्या सर्वांगिण अशा साहित्य, योगदानावर ज्येष्ठ संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केलेल्या १८ खंडांचा यात समावेश आहे.
डॉ. मंगला वरखेडे यांनी संपादित ‘अक्षरबालवाङ्मय’ हाखंड 5 ‘कथामंजुषा’ व खंड 6 ‘वाचनदीपिका’ हे दोन खंड तसेच डॉ.रंजन गर्गे संपादित केलेले शास्त्र व विज्ञान ग्रंथ मूलभूत विज्ञान वरील तीन खंड, डॉ.दिलीप धोंडगे यांनी मराठी वाङ्मयकोश खंड दुसरा भाग दोन ‘मराठी ग्रंथकार (दिवंगत)’ हे संपादित केले असून यासोबत डॉ.मेघा पानसरे यांनी लिहिलेले ‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’, डॉ.नरेंद्र डेंगळे यांचा वास्तुकलेसंदर्भातील ‘महाराष्ट्रातील वास्तुकला परंपरा आणि वाटचाल’ या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील यांनी दिली.
हे ग्रंथ येणार पुन्हा भेटीला
मंडळाकडून यापूर्वी प्रकाशित झालेली कानडी साहित्य परिचय, महाराष्ट्राचे शिल्पकार शंकरराव किर्लोस्कर, महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ, महाराष्ट्राचे शिल्पकार बॅ.नाथ पै, महाराष्ट्राचे शिल्पकार दादासाहेब फाळके, महाराष्ट्राचे शिल्पकार एस.एम.जोशी, महाराष्ट्राचे शिल्पकार गोविंदभाई श्रॉफ, महाराष्ट्राचे शिल्पकार कर्मवीर मामासाहेब जगदाळे, महाराष्ट्राचे शिल्पकार यदुनाथ थत्ते, आराधना, थेरीगाथा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ, अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास, मानवी आनुवंशिकता, महाराष्ट्राचा इतिहास (प्रागैतिहासिक) महाराष्ट्र खंड 1 भाग 1, कन्नड-मराठी शब्दकोश, मराठी शब्दकोश खंड 1 (अ ते औ), अस्पृश्यांचा लष्करी पेशा, स्वातंत्र्याचे भय, मराठी शब्दकोश खंड 2 (क ते ङ), तुळशी मंजिऱ्या व मराठी शब्दकोश खंड 4 (त ते न) इत्यादी अशी मुद्रित व पुनर्मुद्रित केले जाणार आहेत.
नवलेखकांमध्ये १७ जणांचा समावेश
याबरोबर मंडळाच्यावतीने ‘नवलेखक अनुदान’ योजनेत यंदा १७ नव लेखकांचा समावेश असून यात यावर्षी ‘युद्ध पेटले आहे’ लेखक बाळासाहेब नागरगोजे, ‘पेरणी’ लेखक ज्ञानेश्वर क. गायके, ‘वेशीबाहेर’ लेखक राजेश भांडे, ‘वैराण संघर्ष’ लेखक अमोल सुपेकर, ‘इच्छा’ लेखक भारती देव, ‘सुवास रातराणीचा’ लेखक डॉ.यशवंत सुरोशे, ‘रानफुल’ लेखक श्रीमती रुपाली रघुनाथ दळवी, ‘प्रतिशोध’ लेखक निनाद नंदकुमार चिंदरकर, ‘तिनसान आणि इतर तीन मालवणी एकांकिका’ लेखक विठ्ठल सावंत, ‘भुईकळा’ लेखक संदीप साठे, ‘अभंगसरिता’ लेखक अजय चव्हाण, ‘मृत्युंजय’ लेखक वासुदेव खोपडे, ‘डाल्याखालचं स्वातंत्र्य’ लेखक प्रा.डॉ. मनीषा सागर राऊत, ‘मित्रा…!’ लेखक प्रवीण सु. चांदोरे, ‘गावाकडच्या कथा’ लेखक आर.आर.पठाण, ‘परिवर्तन’ लेखक राजरत्न पेटकर व ‘अहिल्यानगरचे मानबिंदू’ लेखक प्रा.डॉ.नवनाथ काशिनाथ वाव्हळ ही नवलेखकांची 17 पुस्तके मंडळाकडून मराठी भाषा गौरवदिनी प्रकाशित होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.