#SakalImpact गळती लागलेल्या उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयावर शिवसेनेची धडक

दिनेश गोगी
मंगळवार, 17 जुलै 2018

बालरोग विभागात मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्याच्या तक्रारी खा. डॉ. शिंदे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी रुग्णालयावर धडक दिली. रुग्णालयाच्या डागडुजीसाठी गेल्या वर्षीच सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळूनही कामाला सुरवात न झाल्याची बाब बैठकीत उघड झाल्यानंतर खा. डॉ. शिंदे यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या सा. बां. विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना फैलावर घेतले.

उल्हासनगर - सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाने गळती लागलेल्या आणि त्यामुळे लहान मुलांना दुसऱ्या वॉर्डात स्थलांतरित करण्याची वेळ आलेल्या उल्हासनगरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयावर आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पदाधिकऱ्यांसोबत धडक दिली. गळतीकडे कानाडोळा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम (पिडब्ल्यूडी) विभागाला फैलावर घेऊन रुग्णालयाची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. याबाबत काही दिवसांपुर्वी 'सकाळ'ने बातमी दिली होती. त्यानंतर येथे शिवसेना पदाधिकारी यांनी पाहणी केली. 

रुग्णालयाच्या डागडुजीला प्रशासकीय मान्यता मिळूनही दुरुस्तीचे काम का हाती घेण्यात आले नाही, असा जाब विचारतानाच वार्षिक देखभाल दुरुस्ती निधीतून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. तसेच संपूर्ण रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून सविस्तर अहवाल सादर करण्यासही त्यांनी बजावले. सुमारे सव्वा कोटींच्या दुरुस्ती खर्चासाठी निधी सा. बा. विभागाला वर्ग करण्याची विनंती त्यांनी दूरध्वनीवरून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे खासगी सचिव महाले यांना केली. त्यानुसार पुरवणी मागण्यांमध्ये निधी मंजूर होऊन तो उपलब्ध करून दिला जाणार आहे.

बालरोग विभागात मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्याच्या तक्रारी खा. डॉ. शिंदे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी रुग्णालयावर धडक दिली. रुग्णालयाच्या डागडुजीसाठी गेल्या वर्षीच सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळूनही कामाला सुरवात न झाल्याची बाब बैठकीत उघड झाल्यानंतर खा. डॉ. शिंदे यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या सा. बां. विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना फैलावर घेतले. मंजुरी मिळूनही आरोग्य विभागाकडून निधी वर्ग होत नसेल तर लोकप्रतिनिधींना याची कल्पना द्यायला हवी होती, नुसते कागदी घोडे का नाचवत बसता, अशा शब्दांत खा. डॉ. शिंदे यांनी त्यांना फटकारले. तसेच, बैठकीतूनच नागपूर येथे अधिवेशनासाठी गेलेले आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे खासगी सचिव श्री. महाले यांच्याशी चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानुसार, चालू अधिवेशनातच पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे रुग्णालयाच्या डागडुजीचा मार्ग खुला झाला आहे. मात्र, या निधीसाठी न थांबता विभागाच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती निधीतून तातडीची दुरुस्ती करा, असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. त्यास सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांनी होकार दिला.

एमआरआय, सिटी स्कॅनसाठी प्रस्तावरुग्णालयात एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधेसाठी मोकळी जागा उपलब्ध असून पीपीपी तत्वावर या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना खा. डॉ. शिंदे यांनी डॉ. सुधाकर शिंदे यांना केली. तसेच, सिटी स्कॅन, एक्स रे मशिन्स आणि व्हेंटिलेटर्ससाठी जिल्हा नियोजन निधीतून मागणी सादर करण्यासही त्यांनी सांगितले.

सा. बां. विभागाकडून सुरू असलेल्या सुतिकागृहाच्या बांधकामाबाबत तक्रारी असून या इमारतीचा वापर सुरू होण्यापूर्वीच एका वॉर्डातील छत कोसळले आहे. त्यामुळे, या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे करणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधीपक्ष नेते धनंजय बोडारे, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, दिलीप गायकवाड, विभागप्रमुख सुरेश सोनवणे, शिवाजी जावळे, दीपक साळवे, सागर उटवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पवार, डॉ. सुधाकर शिंदे यावेळी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Impact Shiv Sena visited the government hospital of Ulhasnagar because of water leaky