Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray
Devendra Fadnavis vs Uddhav Thackerayesakal

..तर मुंबईतील 25 हून अधिक मतदारसंघात भाजप-सेनेतच खरा 'सामना'

Summary

काँग्रेसला मुंबईतील अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक ही लढवावीच लागणार आहे.

मुंबईत आताच्या घडीला विधानसभेची निवडणूक (Assembly Election 2021) झाल्यास ती भाजप (BJP) आणि शिवसेनेतच (Shivsena) होणार आहे. मुंबईत ३६ पैकी १६ आमदार भाजपचे आहेत, तर १४ आमदार शिवसेनेचे आहेत. दोन्ही पक्षांची युती झाली नाही, तर मुंबईतील किमान २५ हून अधिक मतदारसंघात भाजप व सेना या दोन पक्षांतच लढत होणार आहे. काँग्रेस सध्याच्या परिस्थितीत केवळ अल्पसंख्याक समाजापुरती मर्यादित राहिलेली आहे. काँग्रेसला (Congress) मुंबईतील अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक ही लढवावीच लागणार आहे, तर समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही (Nationalist Congress Party) आगामी निवडणूक आव्हानात्मक असून एक जागा वाचवण्यासाठी शिवसेनेशी जुळवून घेण्याव्यतिरिक्त पर्याय सध्या दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपविरोधातील आघाडीचा प्रयोग आता बाळसं धरू लागला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची समीकरणे स्वतंत्र असतील; मात्र पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका (Municipal Corporation Election) आणि तीन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतच लढत होणार आहे.

भाजपला चार मतदारसंघ अवघड

भाजपला दहिसर, वर्सोवा, वडाळा, शीव-कोळीवाडा या चार मतदारसंघात शिवसेनेशी लढावे लागणार आहे. दहिसरमध्ये २०१४ ला शिवसेनेला अंतर्गत नाराजीचा फटका बसला होता. त्यामुळे ही जागा भाजपच्या मनीषा चौधरी यांच्याकडे गेली. येथे शिवसेनेची पकड चांगली असल्याने आगामी निवडणुकीत भाजपला ही लढाई सोपी नसेल. वर्सोवा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजूल पटेल यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपचा विजय सोपा झाला होता. तेथे भाजपच्या डॉ. भारती लव्हेकर या आमदार आहेत. या मतदारसंघातही शिवसेनेची चांगली पकड आहे. त्यामुळे येथेही शिवसेना-भाजपमध्येच लढत रंगणार आहे. शीव-कोळीवाड्यात २०१४ मध्ये शिवसेनेला अंतर्गत नाराजीचा फटका बसला होता. त्यामुळे ही जागा सलग दोन वेळा भाजपचे तमिल सेल्वन निवडून आले. हा मतदारसंघ भाजपसाठी सोपा नाही. वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना, काँग्रेसनंतर भाजप असा त्यांचा प्रवास आहे.

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray
#कलमहाराष्ट्राचा : राज्यात 'मनसे'सह 'वंचित'चा देखील टक्का वाढला

शिवसेनेलाही चार मतदारसंघ आव्हानाचे

शिवसेनेला मागाठाणे हा मतदारसंघ यंदा जिंकणे अवघड आहे. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेचे प्रकाश सुर्वे करत आहेत, तर मनसेमधून भाजपत आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आव्हान निर्माण करू शकतात. अंधेरी पूर्वमध्ये रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार असले, तरी भाजप त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करेल. कलिनामध्ये संजय पोतनीस हे शिवसेनेचे आमदार आहेत; मात्र काँग्रेसमधून भाजपत आलेले कृपाशंकर सिंह त्यांची अडचण वाढवतील. चांदिवली मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे दिलीप लांडे हे आमदार आहेत. हा मतदारसंघ मुस्लिमबहुल मतदारसंघ असून काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. गेल्या वेळी एमआयएम आणि वंचित आघाडीमुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसला होता; मात्र यंदा शिवसेना आणि भाजपमुळेही मतविभाजन होणार आहे.

काँग्रेसची अस्तित्वाची लढाई

काँग्रेसचे मालाड पश्चिमेत अस्लम शेख, वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी, धारावी येथील वर्षा गायकवाड आणि मुंबादेवीचे अमिन पटेल हे चार आमदार आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या अंतर्गत नाराजीनाट्यामुळे मतविभाजन होऊन सिद्दीकी यांचा विजय झाला होता. त्यामुळे ही जागा वाचवण्यासाठी काँग्रेसला चांगलीच मेहनत करावी लागणार आहे. अमिन पटेल यांची मतदारसंघात चांगली पकड आहे; मात्र एमआयएममुळे त्यांच्यापुढे तगडे आव्हान उभे राहू शकते. धारावीत वर्षा गायकवाड यांना वंचित आघाडी आणि एमआयएमचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसला शिवसेना-भाजपत होणाऱ्या मतविभाजनावर अवलंबून राहावे लागणार आहे.

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray
'बंटी पाटलांनी जवळीकता इतकी वाढवली, की भाजपलाही पत्ता लागला नाही'

मनसे, एमआयएम, वंचित ठरणार व्होट ब्रेकर

हे तिन्ही पक्ष विधानसभेच्या निवडणुकीत व्होट ब्रेकर ठरू शकतात. भायखळ्यातून एमआयएमचे ॲड. वारिस पठाण हे २०१४ मध्ये निवडून आले होते. तेव्हा शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या मतविभाजनाचा फायदा त्यांना झाला होता; मात्र आता तेथे मतविभाजन होण्याची शक्यता कमी आहे. एमआयएम आणि वंचित आघाडी हे दोन्ही पक्ष काँग्रेससह समाजवादी पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे. मनसे सध्या याच पठडीत बसणारा पक्ष आहे.

शिवसेनेला मनसेची भीती का नाही?

तरुण मराठी मतदार हा मनसेचा मतदार होता; मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्व भाषिक तरुण मतदार भाजपकडे वळला आहे. त्यात तरुण मराठी मतदारांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. २००९ च्या निवडणुकीत या तरुण मतदाराने मनसेला मतदान केले होते; मात्र त्यानंतर हा मतदार मनसेपासून लांब गेला. हा मतदार शिवसेनेकडे परतलेला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे मनसेमुळे शिवसेनेचे मतं कमी होतील; पण २००९ च्या निवडणुकीप्रमाणे मनसेमुळे शिवसेनेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पडतील, अशी शक्यता कमी आहे.

मंत्र्यांना जुळवून घ्यावे लागणार

महाविकास आघाडीतील चार मोठे मंत्री हे मुंबईतील आहेत. यात मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख हे मालाड पश्चिममधील आमदार आहेत. त्यांना तेथे फारसे आव्हान नाही. ते स्थानिक पातळीवर शिवसेनेशी जुळवून घेऊ शकतात. त्यामुळे भाजपविरोधातील मतं ते स्वत:कडे वळवू शकतील. उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातील आमदार आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक गड असून तेथे कोणताही पक्ष त्यांना आव्हान देऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एमआयएम, वंचितचे आव्हान पेलत शिवसेनेशी लढावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना ही लढाई सोप्पी नाही. अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक हे अणुशक्तीनगर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. २०१४ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे तुकाराम काते आमदार होते. या मतदारसंघात शिवसेनेची चांगली पकड आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

शिवसेना-भाजपचे दिग्गज सुरक्षित

भाजपचे ॲड. आशीष शेलार यांनी वांद्रे पश्चिम, पराग अळवणी यांनी विलेपार्ले, राम कदम यांनी घाटकोपर पश्चिम, मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिल हे मतदारसंघ चांगले बांधले आहेत. त्यांना येथून कोणताही धोका नाही, तर बोरिवली, कांदिवली, घाटकोपर पूर्व, बोरिवली, मुलुंड, कुलाबा हे भाजपचे गड आहेत. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात कोणताही धोका नाही. माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी, सुनील राऊत यांनी विक्रोळी, रमेश कोरगावकर यांनी भांडुप, सुनील प्रभू यांनी दिंडोशी हे मतदारसंघ बांधून ठेवले आहेत. त्यामुळे त्यांना धोका नाही. माहीम, शिवडी, वरळी हे शिवसेनेचे गड आहेत.

युती आघाडीची समीकरणे

आगामी महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची तयारी दाखवली आहे; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास असलेली मुस्लिम मतं शिवसेनेला मिळू शकतात, तर शिवसेनेची मराठी मते राष्ट्रवादीच्या वाटेला येऊ शकतात. दुसऱ्या बाजूला भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू आहे. पालिका निवडणुकीत या युतीचा फायदा भाजपपेक्षा मनसेलाच जास्त होण्याची शक्यता आहे. भाजपच्या अमराठी मतांचा बोनस मनसेला मिळेल; मात्र भाजपच्या अमराठी उमेदवारांना मराठी मतदार पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे.

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray
मुंबईच्या गुंडगिरीला 'सातारी हिसका' सोसणार नाही : शिवेंद्रराजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com