esakal | सरकार बदलण्याच्या मुद्द्यावर संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर

बोलून बातमी शोधा

सरकार बदलण्याच्या मुद्द्यावर संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर

बंगाल निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप नेत्यांवरही केली टीका

सरकार बदलण्याच्या मुद्द्यावर संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या एका सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केलं. 'सरकार केव्हा पाडायचं आणि नवं सरकार केव्हा आणायचं ते तुम्ही माझ्यावर सोडा', असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्या मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, "फडणवीसांना तसं वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राजकारण ही वैचारिक लढाई आहे. जर फडणवीसांनी नव्या सरकारबद्दलची तारीख ठरवली असेल तर त्यासाठीही त्यांना शुभेच्छा", असं मत खोचक संजय राऊत यांनी दिलं.

लॉकडाउनच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, "सध्या देशात लोक नियम पाळत नाहीत हे उघड आहे. त्यामुळे राज्याऐवजी देशात असा निर्णय लावला तर आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्रातच नव्हे तर हरिद्वार, बंगालमध्ये पण हेच सुरू आहे. राज्यात गुढीपाढव्यामुळे काही ठिकाणी गर्दी दिसतेय. पण त्यात आता लोकांनीच शिस्त पाळली पाहिजे. तसं न झाल्यास लॉकडाउन हा एकच पर्याय आहे."

मुंबईत 'वीकेंड लॉकडाऊन'मध्ये किती जणांवर झाली कारवाई?

"पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. त्यात प्रचारादरम्यान नियमभंग केल्याप्रकरणी ममतादीदींवर २४ तासांचा बॅन लावण्यात आला आहे. बंगालमध्ये ममतादीदी सोडून कोणीच नियम मोडले नाहीत का? मला वाटतं हे नवं महाभारत आहे. महाभारतात युद्धाचे कोणतेही नियम पाळले गेले नव्हते. शिखंडीला पुढे करून युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसा बंगालचा शिखंडी कोण? हे पाहावं लागेल", अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

मुंबईकरांनो जरा जपून.... वाचा चिंता वाढवणारी बातमी

"महाराष्ट्राची वैद्यकीय यंत्रणा सर्वोत्तम आहे. सणांवर निर्बंध लादण्यात कोणालाही आनंद होत नसतो. पण जीवाचा प्रश्न असल्यास सणांवर निर्बंध लावण्याची हिंमत या सरकारमध्ये आहे. नियमांचे नीट पालन झाल्यास पुढील गुढीपाडवा आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त असेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.