"दिल्लीत बसून ज्ञानामृत पाजणाऱ्यांची महाराष्ट्राला गरज नाही" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"दिल्लीत बसून ज्ञानामृत पाजणाऱ्यांची महाराष्ट्राला गरज नाही"

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना शिवसेनेचा टोला

"दिल्लीत बसून ज्ञानामृत पाजणाऱ्यांची महाराष्ट्राला गरज नाही"

सध्या राज्यात लसपुरवठ्यावरून राजकारण सुरू आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला गरजेपेक्षा कमी लसी दिल्या जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत केंद्राची बाजू मांडली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जावडेकरांवर टीकास्त्र सोडलं. "केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीत बसून आम्हाला ज्ञानामृत पाजू नये. त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबईत किंवा पुण्यात यावं आणि परिस्थिती हाताळण्यास मदत करावी", अशा शब्दात त्यांनी जावडेकर यांना टोला लगावला.

राज्यातच नव्हे, देशाला लॉकडाउनशिवाय पर्याय नाही- संजय राऊत

नागरिकांचे प्राण की बंगालची निवडणूक...

"देशाच्या प्रमुखांनी अद्याप कोरोना हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. राज्यात देवेंद्र फडणवीसदेखील माजी मुख्यमंत्री होते. ते सांगत होते की लोकांना लॉकडाउन नकोय, मग लोकांना वाचवण्याचा पर्याय तुम्ही सांगा. जगभरात लॉकडाउन हाच पर्याय दिसतोय. जास्तीत जास्त लसी, औषधांचा साठा सर्व राज्यांना देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. देशात लॉकडाउन हवा की नको ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवतील. केंद्र सरकारला वाटत असेल, तर पंतप्रधान 'मन की बात' जनतेला सांगतील. पण मला असं वाटतं की बंगालच्या निवडणुका झाल्यावरच याबद्दलचा निर्णय घेतील", असं मत त्यांनी व्यक्त केलं.

मुंबईत आणखी 4 कोविड सेंटर उभारणार; महापौरांची घोषणा

फक्त गुजरात प्रेम नको!

"राजू शेट्टी म्हणाले की पुण्याच्या सीरम इन्टीट्यूटमधून लसी इतर राज्यांत आणि जगभरात पाठवल्या जात आहेत. जर राज्यावर अन्याय झाला तर आम्ही त्या लसीच्या गाड्या अडवू. त्यांची भूमिका संतप्त होती. जर राज्यावर केंद्राने अन्याय केला तर जनतेच्या संतापाचा उद्रेक नक्कीच होईल. लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या लसीचा गैरवापर होऊ देऊ नका. फक्त गुजरात तुमचं नाही, तुम्ही देशाचे नेते आहात. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो", असा टोमणा त्यांनी मारला. "सध्या देशात दोनच लसी आहेत. इतर लसींना देश परवानगी का देत नाही हा तांत्रिक मुद्दा आहे. राष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हायला हवी. कोविड टास्क फोर्सवाल्यांनी याबद्दल बोलावं", असंही त्यांनी सांगितलं.

Web Title: Sanjay Raut Slams Prakash Javadekar Delhi Covid19 Vaccination Issue Pm Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..