esakal | कंगनाला खडसावणाऱ्या जया बच्चन यांचे म्हणणे बरोबर; राऊतांनी केलं समर्थन
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शन  प्रकरणी अभिनेता आणि खासदार रवि किशनने केलेल्या वक्तव्याचा समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी समाचार घेतला होता.

कंगनाला खडसावणाऱ्या जया बच्चन यांचे म्हणणे बरोबर; राऊतांनी केलं समर्थन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शन  प्रकरणी अभिनेता आणि खासदार रवि किशनने केलेल्या वक्तव्याचा समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी समाचार घेतला होता. या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उडी घेत जया बच्चन यांच्या वक्तव्यास समर्थन दिले आहे. ड्रग्ज प्रकरणात फक्त महाराष्ट्राचेच नाव का घेतले जात आहे, हा प्रश्नही त्यांनी उभा केला. 

राऊत म्हणाले की, जयाजी काही चुकीचं बोलल्या नाहीयेत. त्यांनी संपूर्ण देशाची भावना संसदेत मांडली आहे. आज संपूर्ण इंडस्ट्री गप्प आहे, वातावरण असे आहे  की लोक बोलायला घाबरत आहेत. याप्रकारचे वातावरण आणीबाणीमध्ये होतं. परंतु आणीबाणीमध्येही किशोर कुमार सारखे खूप सारे कलाकार समोर आले होते. 

काही लोक हे फिल्म इंडस्ट्रीची बदनामी करत आहेत. ही फक्त इंडस्ट्रीची बदनामी नाहीये तर आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरेचीही बदनामी आहे. हे फक्त फिल्म इंडस्ट्रीत आहे का? राजकारण आणि इतर कोणत्या क्षेत्रात नाहीये?  याला थांबवण्याची जबाबदारी जितकी सरकारची आहे तितकीच आपलीही आहे. 

जयाजींनी देखील हीच गोष्ट अधोरेखित केली की काही लोकांमुळे इंडस्ट्री बदनाम होत आहे. वरपासून ते खालीपर्यंत जवळपास पाच लाख लोकांना ही इंडस्ट्री रोजगार देते. जे लोक याला नष्ट करतायत त्यांना थांबवलं पाहिजे. 

हे वाचा - कमेंट केली आणि मानले Facebookचे आभार; कंगनाकडून मोठी चूक, होतेय ट्रोल

आज समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी बॉलीवूडला ड्रग्जशी जोडणाऱ्यांना धारेवर धरलं होतं. 'हे' लोक फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करत आहेत, असा आरोप नाव न घेता कंगना राणावत आणि रवि किशन यांच्यावर केला होता. त्या म्हणाल्या होत्या की ज्या लोकांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं तेच लोक आता याला गटरीची उपमा देत आहेत. मी याच्याशी बिलकूल सहमत नाहीये. ज्या ताटात खातात त्याच ताटात ते छेद करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला होता.