
'लग्नात जंगलाचा सेट, ९ कोटींचं कार्पेट आणि...' राऊतांनी मांडला हिशेब
शिवसेना आणि ठाकरे परिवारावर मागील काही दिवसांपासून चिखलफेक होत आहे. त्याला आम्ही उत्तर देऊच. पण भाजपचे साडेतीन लोक तुरुंगामध्ये जाणार, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यानंतर त्यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. (Sanjay Raut Press Conference)
एक तुम्ही सरेंडर व्हा, किंवा तुमच्यावर कारवाई होईल, अशा धमक्या येत आहे. तुम्ही काही लोकांनी मदत केली नाही, तर केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, असं धमकावण्यात आल्याचं राऊतांनी सांगितलं. हा धमकीचा कॉल आल्यानंतर माझ्यासह सक्तवसुली संचलनालयाच्या धाडी पडायला सुरुवात झाली, असा आरोप राऊत यांनी केला.
"मेहेंदीवाल्यांनाही सोडलं नाही"
मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या हिशोबाला लागले. हारवाले, मंडपवाले, मेहंदीवाल्याकडे गेले. किती पैसे दिले अशी विचारणा केली. गुजरातमध्ये इतका घोटाळा झाला त्याचं काहीच केलं नाही. भाजपच्या एका मंत्र्याच्या मुलीचं लग्न झालं. त्यात जंगलाचा सेट केला. त्यात कार्पेट टाकलेलं होतं. या कार्पेटची किंमत साडेनऊ कोटी होती. त्यांनी नाव न घेता मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे. मुनगंटीवारांकडे त्या वेळी वन खातं होतं.
घरात शिरायचं नाही, पण तुम्ही आमच्या घरात शिरताय, मुलांच्या, नातेवाईकांच्या घरात शिरताय. जेलमध्ये टाकणार आहात , टाका, पण माझ्यासोबत तुम्हीही असणार आहात, असा घणाघात राऊत यांनी केला.
मला कुणीतरी म्हटलं की, तुम्ही जिथे कपडे शिवले तिथेही गेले. ईडी हा काय प्रकार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. टेलरकडेसुद्धा हे लोक गेले, किती पैसे दिले, किती सूट दिले. आता फक्त चप्पल वाल्याकडे जायचं बाकी राहिलंय. तुम्ही कुठेही जा पण सामना शिवसेनेशी आहे, असं राऊत म्हणाले.