
सत्यशोधक मनोहर कदम पुरस्कार सचिन परब, जुलेखा शेख मानकरी
मुंबई : सत्यशोधक मनोहर कदम जागितक संशोधन संथेचे पुरकार जाहीर झाले असून सत्यशोधक चेतना पुरकार पत्रकार सचिन परब यांना तर 2020 चा कार्यकर्ता पुरस्कार जुलेखा शेख यांना देण्यात येईल. मुंबईत सात डिसेंबर रोजी एका समारंभात या पुरस्कारांचे वितरण केले जाईल, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती प्रतिमा जोशी व सेक्रेटरी अंकुश कदम यांनी दिली.
स्व. मनोहर कदम हे इतिहास संशोधक, कथाकार व प्रागतिक चळवळीतील जीवनदानी कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. चार डिसेंबर या त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी मुंबईत सत्यशोधक प्रबोधन जागर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात कार्यकर्ता, संशोधक-अभ्यासक यांना सत्यशोधक चेतना पुरस्काराने गौरविले जाते. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
जुलेखा शेख या संगमनेर तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आहेत. परित्यक्त्या, विधवा, निराधार स्त्रीयांच्या प्रश्नावर त्या काम करीत आहेत. तसेच महिला सक्षमीकरण चळवळीतही त्यांचे मोलाचे योगदान आहे. तर गेली 25 वर्षे पत्रकारिता करणाऱ्या सचिन परब हे राज्यातील संतपरंपरेचा सामाजिक व सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या आषाढी एकादशी वार्षिक विशेषांकाचे संपादक आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने प्रकाशित केलेल्या प्रबोधनामधील प्रबोधनकार या नियतकालिकातील लेखांचे संपादनही त्यांनी केले आहे.