जमीन घोटाळ्याप्रकरणी नायब तहसीलदार निलंबित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

दिव येथील ३४३ एकर शासकीय जमीन घोटाळाप्रकरणी नायब तहसीलदार सिराज तुळवे यांना कोकण आयुक्तांनी निलंबित केले आहे.

रोहा (बातमीदार) : दिव येथील ३४३ एकर शासकीय जमीन घोटाळाप्रकरणी नायब तहसीलदार सिराज तुळवे यांना कोकण आयुक्तांनी निलंबित केले आहे. प्रकरणातील दलाल व शासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी 
सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली आहे. 

रोहा तालुक्‍यात तेलशुद्धकरण प्रकल्प उभारण्यात येत असल्याची कुणकुण लागताच या भागातील जमिनी खरेदी-विक्री व्यवहार तेजीत आला आहे. याच दरम्यान दिव गावातील गट क्रमांक १३३ वरील ३४३ एकर जमीन ही सरकारी जमीन दलालांनी विकण्याचा घाट घातला. त्यावर गावातील काही शेतकऱ्यांची वहिवाट होती; मात्र त्याच्या काहीही नोंदी नव्हत्या.

दलालांनी शेतकऱ्यांच्या सह्या मिळवल्या. प्रथम ही जमीन शासकीय जमीन नसून खोती आहे, असा निर्णय नायब तहसीलदार तुळवे यांनी दिला. त्यानंतर त्या जमिनीवर १४० कुळांची नावे लावली. ज्यात शेतकरी,  दलाल व त्यांचे नातेवाईक अशा लोकांचा समावेश होता. कुळांकडून कूळ मुखत्यारपत्र त्यांचे नाव सात बारावर लागण्याआधीच करून घेऊन त्याची दुय्यम निबंधकांकडे नोंदही केली गेली होती. खाजण जमीन शेतकऱ्यांच्या नावे होताच ती कुलमुखत्यार पत्राद्वारे विक्रीही झाली. ४ कोटी ९५ लाखाचा व्यवहार झाला. घडामोडी केवळ २ महिन्यांच्या कालखंडात पूर्ण झाल्या आहेत. याबाबत सर्वहारा संघटनेस माहिती होताच त्यांनी याविरुद्ध आंदोलन छेडले. 

दिव येथील शासकीय जमीन घोटाळाप्रकरणी नायब तहसीलदार सिराज तुळवे यांचे कोकण आयुक्तांनी निलंबन केले आहे. 
- कविता जाधव, तहसीलदार, रोहा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scam in Land.. Suspended nayab tahsildar