Mumbai : लस न घेतलेल्यांचा शोध घेणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

लस न घेतलेल्यांचा शोध घेणार

मुंबई : मुंबईत लशीच्या पहिल्या डोसचे लक्ष्य पूर्ण होण्याची परिस्थिती असताना अनेक जण अजूनही लशीपासून वंचितच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा नागरिकांची शोधमोहीम राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला लस मिळावी म्हणून पालिका सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबवणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीनंतर महापालिकेने ‘हर घर दस्तक’मोहीम अधिक व्यापकपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील ९२ लाख ३६ हजार ५०० नागरीकांनी आतापर्यंत कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस देण्यातही मुंबई आघाडीवर आहे.

मात्र, अजूनही काही नागरिकांनी पहिला डोसही घेतलेला नाही. अशांसाठी शोधमोहीम राबविणार आहे. पालिकेच्या माध्यमातून दररोज एक ते दीड लाखांपर्यंत लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये दुसरा डोस घेतला नसलेल्या तीन लाखांवर लाभार्थ्यांना वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून संपर्क केला जातो.

मात्र आतापर्यंत संपर्क केलेल्या २५ टक्के जणांनी मुंबईबाहेर डोस घेतला आहे, तर काहींनी दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून नोंदणी केल्याने नोंद दिसत नसल्याचे सांगण्यात आले.

loading image
go to top