कबड्डीचा थरार 5 डिसेंबरपासून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्हाभरातील साधारण 100 पंच काम पाहाणार आहेत. यामध्ये तंदुरुस्तीबरोबरच प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

अलिबाग, ता.24 ः रायगड जिल्ह्यात कबड्डीच्या यंदाच्या हंगामाला 5 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या दिवशी उरण तालुक्‍यातील बोकडवीरा येथे 5 डिसेंबरपासून जिल्हा निवड चाचणी स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धेत सुमारे 256 पुरुष आणि 32 महिला कबड्डी संघ सहभागी होणार आहेत. याच दिवसापासून जिल्ह्यातील कबड्डीच्या नवीन हंगामाला सुरुवात होणार आहे. 

जिल्ह्याच्या संघात निवड व्हावी, असे प्रत्येक कबड्डीपटूला वाटत असते. त्यासाठी यंदा खूप मोठे आव्हान आहे. चाचणी स्पर्धेत निवड झालेले पुरुष आणि महिला कबड्डी संघ 19 ते 22 डिसेंबरला चिपळूण येथे होणाऱ्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहेत. बोकडवीरा येथे चार दिवस चालणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेसाठी सुमारे 3 हजारपेक्षा अधिक खेळाडू नशीब आजमावणार आहेत. दररोज 64 संघांचे सामने होणार आहेत. त्यासाठी सहा मैदाने तयार करण्यात आली आहेत. 

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्हाभरातील साधारण 100 पंच काम पाहाणार आहेत. यामध्ये तंदुरुस्तीबरोबरच प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

डावपेचांबरोबरच खेळाडूंना फिटनेसबद्दल टिप्स देणे महत्त्वाचे असते. निवड चाचणी स्पर्धेदरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून आहार, व्यायाम, सराव या संदर्भात कोणती काळजी घेणे आवश्‍यक आहे, याचा माहिती दिली जाणार आहे. 
- ऍड. आस्वाद पाटील, सरकार्यवाह, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन. 

निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला कसब दाखवण्याची संधी आहे. निवड होणाऱ्या संघासाठी 8 दिवसांचे प्रशिक्षण शिबिर असेल. 
- कैलास पाटील, प्रशिक्षक, रायगड जिल्हा कबड्डी संघ. 

निवड चाचणी स्पर्धेत रायगड जिल्ह्याचा पुरुष आणि महिलांचा प्रत्येकी 12 खेळाडूंचा संघ निवडला जाणार आहे. त्यांना चिपळूण येथील राज्यस्तरीय निवडचाचणी स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. 
- जे. जे. पाटील, सहकार्यवाह, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The season for kabaddi in Raigad district starts on December 5