मुंबई महापालिका समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचं पाणी बनवणार

समीर सुर्वे
Wednesday, 23 September 2020

या प्रकल्पासाठी साधारण 20 ते 25 एकर जागा लागणार आहे. एकाच ठिकाणी जागा उपलब्ध न झाल्यास दोन ठिकाणी हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

मुंबई  : मुंबई महानगर पालिकेने पुन्हा समुद्रापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा  निर्णय घेतला आहे. समुद्रातून दिवसाला 200 दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याची पडताळणी आता सुरु झाली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या प्रकल्पाचा आढावा घेतला आहे.

या प्रकल्पासाठी साधारण 20 ते 25 एकर जागा लागणार आहे. एकाच ठिकाणी जागा उपलब्ध न झाल्यास दोन ठिकाणी हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यासाठी मालाड येथील जागेचा विचार सुरु आहे. सुरुवातीची दोन वर्ष कागदी कारवाई होणार असून त्यानंतर 3 वर्षात हा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अतिरीक्त आयुक्त पी वेलारसू यांनी अशा प्रकल्पाचा विचार सुरु असल्याचे सांगितले.

महत्त्वाची बातमी - मराठा समाजासाठीचे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले ९ महत्त्वाचे निर्णय

2009 मध्ये अपुऱ्या पावसामुळे सर्वप्रथम समुद्राचे पाणी गोडं करण्याचा विचार पुढे आला होता. मात्र, हे पाणी शुध्द करण्यासाठी प्रत्येक 1 हजार लिटर पाण्यासाठी 52 ते 56 रुपये खर्च येत होतात. तर धरणातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी 16 रुपयांचा खर्च येत होता. त्यामुळे हा प्रकल्प तेव्हा रद्द करण्यात आला होता. मुंबईला सध्या रोज 4200 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून 3900 दशलक्ष लिटर पाण्याचा प्रत्यक्ष पुरवठा होत आहे.

महत्त्वाची बातमी  देशातील बड्या उद्योगपतीच्या मुलीच्या बँक अकाउंटवर डल्ला, कुलाबा पोलिसांकडून तपास सुरु

महागडा प्रकल्प म्हणून 11 वर्षांपुर्वी पालिकेने हा प्रकल्प रद्द केला होता. मात्र, आता बदलत्या तंत्रज्ञानामुळे गोडं पाणी तयार करण्याचा दर कमी झाला आहे. नव्या तत्रज्ञाने 1 हजार लिटर पाणी गोडं करण्यासाठी 18 ते 19 रुपये खर्च येतो. त्याच बरोबर पालिका बांधणार असलेल्या गारगाई धरणात तब्बल तीन लाख झाडे पाण्याखाली येणार आहे. धरणांमुळे हे पर्यावरणाचे होणारे नुकसानही मोठे असते. त्याचबरोबर धरणाच्या परवानग्या मिळून प्रत्यक्ष काम सुरु होण्यासाठी बराच विलंब होतो. त्यामुळे पालिका पुन्हा समुद्राचे पाणी गोडं करण्याचा विचार करत आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

seawater to drinking water project BMC is planning to start this project for mumbikar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seawater to drinking water project BMC is planning to start this project for mumbikar