ठाणे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

१० प्रवेशद्वारांवर ६६ जवान तैनात; १.२५ कि.मी.ची संरक्षण भिंत बांधणार

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या आणि गर्दीच्या रेल्वेस्थानकांच्या सुरक्षेबाबत काही उपाययोजना राबविल्या आहेत. यामध्ये आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने सर्वात जास्त व्यस्त स्थानकांपैकी एक असलेल्या ठाणे स्थानकाच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये ठाणे स्थानकात १० प्रवेशद्वारे; तसेच १.२५ किलोमीटरची सीमा भिंत बांधली जाणार असून सर्व प्रवेशद्वारांवर ६६ जवान तैनात करण्यात येणार आहे. या स्थानकाच्या सुरक्षेसाठी २७ लाख रुपयांचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून ३१ मार्च २०२० पर्यंत स्थानकातील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांत धातूशोधक यंत्रे (मेटल डिटेक्‍टर) आणि सामान तपासणी यंत्रे (बॅगेज स्कॅनर) बसवण्यात आली. या यंत्रांच्या देखभालीची जबाबदारी मध्य रेल्वेच्या सिग्नल आणि टेलिकॉम यंत्रणा विभागाकडे असते. ठाणे रेल्वेस्थानकातून नियमित साडेतीन लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत असून त्या प्रवासीसंख्येसह पासधारक आणि एक्‍स्प्रेसने प्रवास करणारी असे सुमारे सात-आठ लाख प्रवासी दररोज ये-जा करतात.

तसेच दहा फलाटांचे रेल्वेस्थानक असून आत-बाहेर करण्यासाठी तब्बल २३ प्रवेशद्वारे आहेत. या स्थानकात पोहोचण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून वापरात असलेले यातील २० मार्ग बेकायदा आहेत. त्यामुळेच हे प्रवेशमार्ग बंद करून नवीन १० प्रवेशद्वारे उभारण्यात येणार आहेत. रेल्वेने प्रवाशांसाठी अधिकृत ठरवलेल्या या दहा प्रवेशद्वारांवरील सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.

स्थानकातील प्रवासीसंख्येनुसार दहा प्रवेशद्वारांवर ‘डोअर फ्रेम मेटल डिटेक्‍टर’ व देखरेखीसाठी ६६ आरपीएफ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले आहे.

अशी असेल सुरक्षा
दहा प्रवेशमार्गांवर मेटल डिटेक्‍टर
लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी बॅग स्कॅनर
प्रत्येक प्रवेशमार्गवर एकूण ६६ जवान तैनात

प्रवासी सुरक्षेत वाढ करण्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावरील पाच गर्दीची स्थानके निवडली आहेत. त्यापैकी ठाणे स्थानकाच्या सुरक्षेसाठी १० प्रवेशद्वारांवर ६६ जवान तैनात करण्यात येणार आहेत.
- के. के. अश्रफ
, वरिष्ठ विभागीय आयुक्त, आरपीएफ, मध्य रेल्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security increase of Thane Railway station