'सेल्फ फायनान्स'चा कटऑफ घसरला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

बारावी परीक्षेचा निकाल घसरल्याने "सेल्फ फायनान्स' अभ्यासक्रमांच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण घोडदौडीला यंदा ब्रेक लागला आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. काही महाविद्यालये वगळता अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये सेल्फ फायनान्स विभागांचा कटऑफ यंदा दोन ते तीन टक्‍क्‍यांनी घसरला आहे.

मुंबई - बारावी परीक्षेचा निकाल घसरल्याने "सेल्फ फायनान्स' अभ्यासक्रमांच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण घोडदौडीला यंदा ब्रेक लागला आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. काही महाविद्यालये वगळता अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये सेल्फ फायनान्स विभागांचा कटऑफ यंदा दोन ते तीन टक्‍क्‍यांनी घसरला आहे.

पदवी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी (ता. 17) सायंकाळी जाहीर झाली. यात विद्यार्थ्यांनी पुन्हा पारंपरिक शाखांना प्राधान्य देत सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांना पर्याय म्हणून निवडल्याचे पाहायला मिळते. विद्यापीठाकडे आलेल्या प्रवेशपूर्व नोंदणी अर्जांत मॅनेजमेंट स्टडीज्‌साठी एक लाख 31,716 सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले होते; तर अकाउंटिंग अँड फायनान्ससाठी 69,109, बॅंकिंग अँड इन्शुरन्ससाठी 20,751, फायनान्स मॅनेजमेंटसाठी 13,616, मास मीडियासाठी 46,025 असे दोन लाख 81,217 अर्ज सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमासाठी प्राप्त झाले होते.

कला शाखेचा वाढलेला टक्का वगळता बी. एस्सी. आणि बी. कॉम.सारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांचा कटऑफ यंदा "जैसे थे' राहिला आहे. काही महाविद्यालयांमधील कटऑफ एक ते दीड टक्‍क्‍यांनी वाढला असून, बहुतांश महाविद्यालयांचा कटऑफ गतवर्षीप्रमाणेच आहे. यंदा सर्वाधिक एक लाख 88,559 अर्ज बी. कॉम.साठी; तर बी.एस्सी.साठी 47,381, बी. ए.साठी 46,840, बी. एस्सी. (आयटी)साठी 52 हजार 890, बी. एस्सी. (कॉम्प्युटर)साठी 29 हजार 492; तर बायो-टेक्‍नॉलॉजीसाठी 14 हजार 807 अर्ज दाखल झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Self Finance Study Break by HSC Result Decrease Education