शिवडी रुग्णालय मृतदेह प्रकरणः रुग्णालयाच्या अधिक्षकांना तत्काळ पदावरुन दूर करा

समीर सुर्वे
Sunday, 8 November 2020

शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या शौचालयात आढळलेल्या रुग्णाच्या मृतदेहा प्रकरणावरुन रुग्णालय व्यवस्थापनाच्या बेदरकार कारभारावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्याच बरोबर रुग्णालयाच्या अधिक्षकांना तत्काळ पदावरुन दूर करावे अशी शिफारस महापालिकेने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे.

मुंबई: शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या शौचालयात आढळलेल्या रुग्णाच्या मृतदेहा प्रकरणावरुन रुग्णालय व्यवस्थापनाच्या बेदरकार कारभारावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्याच बरोबर रुग्णालयाच्या अधिक्षकांना तत्काळ पदावरुन दूर करावे अशी शिफारस महापालिकेने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. त्याच बरोबर संबंधित परिचारीका आणि वॉर्ड बॉय यांचीही चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

सूर्यभान यादव या 27 वर्षीय तरुण रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. दैनिक सकाळने सर्वप्रथम हा प्रकार उघड केला होता. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पालिकेच्या उप आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने शुक्रवारी चौकशीचा अहवाल प्रशासनाना सादर केला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल या अहवालावर अंतिम निर्णय घेणार आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी आयुक्तांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र,संपर्क होऊ शकला नाही.

अधिक्षक ललितकुमार आनंदे यांना तत्काळ पदावरुन दूर करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. त्यांच्यावर निष्काळजी पणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच,संबंधित परिचारीका आणि वॉर्डबॉयचीही चौकशी करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. या प्रकरणात रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसही चौकशी करत असून त्यांचा अहवालही आठवडाभरात तयार होण्याची शक्यता आहे.
 
200 जणांच्या जबान्या

पालिकेच्या समितीने 200 जणांच्या जबान्या घेतल्या आहे. त्यातून व्यवस्थापनावर निष्काळजी पणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. सूर्यभान यादव बेपत्ता असल्याचे त्यांच्या वैद्यकीय फाईलवर वैद्यकिय अधिक्षकांनी लिहीले होते. मात्र प्रशासनाकडून पुढील तपासणी करण्यात आली नाही. 

अधिक वाचाः  अर्णब गोस्वामी अटकः टीका करणाऱ्या विरोधकांना राऊतांचं रोखठोक उत्तर

यादव हा तरुण सप्टेंबर महिन्यातच उत्तर प्रदेशातील मिर्झापुर येथून मुंबईत नोकरीसाठी आला होता. त्याला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने गोरेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे,त्याला कोविड बरोबर क्षयाची बाधा झाल्याचे आढळल्याने 30 सप्टेंबर रोजी शिवडी टिबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 4 ऑक्टोबरच्या पाहाटे पासून तो बेपत्ता होता.तशी पोलिस ठाण्यात तक्रारही करण्यात आली होती. 18 सप्टेंबर रोजी रुग्णालयाच्या शौचालयात सूर्यभान यादवचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.

-------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Sewri Hospital Mortality Case Remove the Superintendent of Hospital immediately


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sewri Hospital Mortality Case Remove the Superintendent of Hospital immediately