दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या शाहरुख खानला नागरिकांनी केले पोलिसांच्या हवाली

सोसायट्या, चाळीतील घरांचे दरवाजे उघडे दिसले की सराईतपणे घरात घुसून शाहरुख खान चोरी करायचा.
Shahrukh Khan
Shahrukh KhanSakal
Summary

सोसायट्या, चाळीतील घरांचे दरवाजे उघडे दिसले की सराईतपणे घरात घुसून शाहरुख खान चोरी करायचा.

डोंबिवली - सोसायट्या, चाळीतील घरांचे दरवाजे उघडे दिसले की सराईतपणे घरात घुसून शाहरुख खान चोरी करायचा. कल्याण पश्चिमेतील रामवाडी परिसरातील एका घरात अशाच पद्धतीने चोरी करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र त्याचा डाव फसला, घरातील मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी चोरट्या शाहरुखला पकडत, महात्मा फुले चौक पोलीसांच्या हवाली केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले असता त्याने पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

कल्याण पश्चिमेतील रामवाडी परिसरात प्रेमनाथ मोदगीकर (वय 63) हे राहतात. रविवारी दुपारी प्रेमनाथ यांच्या घरातील काही मंडळी बाहेर गेली होती. त्यांची मुलगी सीमरन ही घरात एकटीच होती. यावेळी घराचा दरवाजा उघडा असल्याने या संधीचा फायदा शाहरुखने घ्यायचे ठरवले. सीमरन ही किचनमध्ये असल्याचे लक्षात येताच हॉलमध्ये दर्शनी भागात असलेला मोबाईल चोरुन त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला.

घरात कोणीतरी आले आहे याची चाहूल लागल्याने तीने बाहेर येऊन पाहीले असता शाहरुखवर तिची नजर गेली. तिने लगेच आरडा ओरडा करत शाहरुखला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमरनला धक्का देत खाली पाडत शाहरुखने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

सिमरनचा आरडा ओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत शाहरुखला पकडून ठेवत महात्मा फुले चौक पोलिसांशी संपर्क साधला. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे एपीआय देवदास ढोले, विजय भालेराव, पोलीस नाईक शेळके, शिरसाठ, जितू पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत चोराला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी करत झाडाझाडती घेतली असता त्याने याआधी पाच गुन्हे केल्याची कबुली दिली. तो कळवा येथे राहणारा असून त्याच्या घरातून पोलीसांनी चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com