शरद पवार आमचे विठ्ठल : संजय राऊत 

ठाणे : जितंद्र आव्हाड यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : जितंद्र आव्हाड यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे : आम्ही राज्यामध्ये दोनच विठ्ठलांची पूजा केली आहे. एक विठ्ठल आज आमच्या सोबत मंचावर बसले आहेत; ते शरद पवार आणि दुसरे विठ्ठल म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाला बोट धरून मंत्रालय दाखविले. आता "अपना टाईम आया है'. शरद पवार यांनी महाराष्ट्रातून परिवर्तनाची सुरुवात केली आहे. ते आता दिल्लीचे तख्त बदलवून टाकतील; तेच दिल्लीमध्येही परिवर्तन घडवतील, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

कळवा येथील खारीगाव परिसरातील 90 फुटी रोडवर आयोजित "ठाणे फेस्टिव्हल'च्या समारोपप्रसंगी खासदार राऊत बोलत होते. राऊत पुढे म्हणाले, शरद पवार हेच महाविकास आघाडीचे उद्‌गाते आहेत. शरद पवार हे सर्वांना भावनिक होऊन जाऊ नका, असे सांगतात. मात्र, आयुष्य हे भावनेवरच चालले आहे. ज्या दिवशी शरद पवार यांना ईडीची नोटीस आली. त्याचदिवशी बदल व्हावा, हे मनात आले होते. त्यातून महाविकास आघाडीची पायाभरणी झाली होती.

आज महाविकास आघाडीतील जे तीन पक्ष आहेत. त्यांची तोंडे तीन वेगवेगळ्या दिशांना होती. पण, आम्ही गेल्या पाच वर्षात खूप काही भोगले होते. आता पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाहेर पडलो आहोत. महाराष्ट्रातील या परिवर्तनाची नांदी देशभर होणार असून दिल्लीतील परिवर्तनाची सूत्रे ही शरद पवार यांच्याच हाती असणार आहे, असेही ते म्हणाले. 

आपणाला बाळासाहेब ठाकरे यांच्या एका व्यंगचित्राची आठवण येते. "एक शरद दोन गारद' असे या व्यंगचित्राचे शिर्षक होते. मात्र, आज आम्ही असे म्हणतो की, "एक शरद, सगळे गारद'. शरद पवारांचे आदेश ऐकून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. महाविकास आघाडीमुळे ठाण्याला दोन मंत्री मिळाले आहेत. आमचे महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या कामांसाठी स्थापन झाले आहे. लोकांचे फोन टॅप करायला नाही, असा टोलाही त्यांनी आधीच्या सरकारला लगावला. 

नावाआधी डॉक्‍टर लावू नका : आव्हाडांना सल्ला 
डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे कौतूक करताना खासदार संजय राऊत म्हणाले, जितेंद्र तुम्ही नावाच्या आधी डॉक्‍टर वगैरे लावू नका: कारण, या देशात दोनच जितेंद्र झाले आहेत. एक सिनेमातील आणि दुसरे तुम्ही! सिनेमातील जितेंद्रप्रमाणेच तुम्हीही राजबिंडे आहात. तुम्ही स्वत:ला आरशात बघा; म्हणून डॉक्‍टर वगैरे म्हणण्यात काही नाही. तुम्ही पवार आणि जनतेच्या मनातील "जितेंद्र' आहात. निष्ठा म्हणजे काय असते हे केवळ आणि केवळ जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनच शिकावे. आपणाला काय मिळेल, याची तमा न बाळगता केवळ काम करण्याची वृत्ती जितेंद्र आव्हाड यांची आहे. म्हणून आम्ही आव्हाडांच्या प्रेमात आहोत. पण, ते पवारांच्या प्रेमात आहेत. जे आव्हाड पवारांच्या प्रेमात नसते तर सेनेचे मंत्री झाले असते, अशा शब्दात राऊत यांनी आव्हाडांचे कौतुक केले. 

अन्‌ ठाणे पालिका मोठी झाली... 
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. शरद पवार हे काहीही करू शकतात, हे त्यांनीच सिद्ध केले आहे. शरद पवार यांचे नाव ठाण्यातील एका स्टेडीयमला दिल्यामुळे ठाणे महापालिका मोठी झाली आहे, असेही ते म्हणाले. 

शरद पवारांनी ओळख दिली : आव्हाड 
आपल्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. आव्हाड यांनी आपली जडणघडण सांगितली. 2009 साली आपणाला कळव्यातून 5 हजार मतांची पिछाडी मिळाली होती. त्यावेळी मी प्रत्येकवेळी हे लोकांना बोलून दाखविले होते. मात्र, त्यानंतर त्यांना असेही सांगितले की मी एवढे काम करून दाखवेन की मतदारांनाच खंत वाटेल. अन्‌ 2014 मध्ये 18 हजार आणि 2019 मध्ये 36 हजारांचे मताधिक्‍य मिळाले, असे ते म्हणाले. शरद पवार यांच्याबद्दल ऋण व्यक्त करताना, आई-वडिलांनी मला जन्म दिला असला तरी शरद पवार यांनी मला ओळख दिल्याचे आव्हाड यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com