मुंबईत शिवसेना सर्व जागा लढणार 

मृणालिनी नानिवडेकर - सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई - मुंबईतील सर्व म्हणजेच 227 वॉर्डांची चाचपणी पूर्ण झाली असून, शिवसेनेला मिळणाऱ्या मुंबईकरांच्या पाठिंब्यात प्रचंड वाढ झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्रस्त झालेली जनता आता सेनेच्याच पाठीशी उभी राहणार असल्याचे सर्वेक्षणांनी दाखवून दिले आहे. गेली कित्येक वर्षे प्रेमपूर्वक सांभाळली गेलेली युती कायम राहावी, असे शिवसेनेला वाटत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या पक्षातले काही नेते अवास्तव वक्‍तव्ये करून युतीतला अडसर ठरत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून दिली जात आहे.

मुंबई - मुंबईतील सर्व म्हणजेच 227 वॉर्डांची चाचपणी पूर्ण झाली असून, शिवसेनेला मिळणाऱ्या मुंबईकरांच्या पाठिंब्यात प्रचंड वाढ झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्रस्त झालेली जनता आता सेनेच्याच पाठीशी उभी राहणार असल्याचे सर्वेक्षणांनी दाखवून दिले आहे. गेली कित्येक वर्षे प्रेमपूर्वक सांभाळली गेलेली युती कायम राहावी, असे शिवसेनेला वाटत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या पक्षातले काही नेते अवास्तव वक्‍तव्ये करून युतीतला अडसर ठरत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून दिली जात आहे. त्यातच भाजपने येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांत युती करण्याचा प्रस्ताव शिवसेनेला पाठवला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र आघाडी कुठे करायची, याचा अंतिम निर्णय स्थानिक कार्यकारिणी घेणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. 

सरत्या वर्षाला निरोप देताना राजकीय पक्ष महापालिका आणि जिल्हा परिषदांची गणिते आखत आहेत. मुंबईतील सर्व वॉर्डांत शिवसेनेची निवडणूक तयारी झाली असल्याची माहिती राज्यसभा सदस्य आणि उद्धव ठाकरे यांचे विश्‍वासू सहकारी अनिल देसाई यांनी "सकाळ'ला दिली. शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक 4 जानेवारी रोजी मुंबईत होत असून, महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा बिगुल याच कार्यक्रमात वाजणार, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. शिवसेनेने निवडणुकीला सामोरे जाण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. मुंबईत शाखा हे शिवसेनेचे जनतेशी संबंध ठेवणारे सर्वांत महत्त्वाचे माध्यम आहे. मुंबईतील 80 टक्‍के शाखांना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी स्वत: भेटी दिल्या आहेत. नोटाबंदीच्या तुघलकी अंमलबजावणीमुळे नाराज झालेले अन्य पक्षांचे समर्थकही आता आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेनेला तरणोपाय नसल्याचे मानू लागल्याचे शिवसेनेतील निर्णय घेणाऱ्या गटाचे मत आहे. भाजपने निवडणुकीत युती करण्याचा प्रस्ताव पाठवला, तर शिवसेनेची भूमिका काय असेल यावर पक्षात बरेच विचारमंथन झाल्याचे सांगण्यात येते. मंत्रिमंडळातील सदस्यांचा कल युतीकडे असला, तरी सामान्य शिवसैनिकाला आता लढण्याची संधी हवी असल्याचे चित्र या बैठकांमध्ये स्पष्ट झाल्याचे समजते. सेनेचे मुंबईतील जाळे विशाल असून गटप्रमुखांची बैठक बोलवायची झाली, तरी किमान 50 हजार शिवसैनिक बसू शकतील अशी व्यवस्था करावी, लागते याकडे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय हर्षल प्रधान यांनी लक्ष वेधले. 

उभय पक्षातील संबंध ताणले गेले असतानाच भाजपने मात्र युतीसाठी आम्ही आजही उत्सुक आहोत, असा पवित्रा घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांसंबंधीचा युतीचा प्रस्ताव शिवसेनेला पाठवला जाईल, असे पत्रकारांना सांगितले. शिवसेनेशी आघाडी करायची काय, याचा निर्णय मात्र भाजपच्या स्थानिक कार्यकारिणीच्या ठरावानुसार होईल, असे नमूद करीत संदिग्धता कायम ठेवली आहे. शिवसेनेने या स्थानमाहात्म्याचा वेगळा अर्थ लावला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात असलेल्या काही नेत्यांनी युतीच्या विरोधात वक्‍तव्ये करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र "या बेडक्‍या कितीही फुगल्या तरी बैल होऊ शकत नाहीत,' अशी शिवसेनाछाप टिप्पणी कोणाचेही नाव न घेता केली आहे. 

Web Title: Shiv Sena contesting all the seats