शिवसेना नगरसेवकाकडून तरुणांना बेदम मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

नवी मुंबई - ऐरोलीतील शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी किरकोळ कारणावरून दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर रबाळे पोलिसांनी नगरसेवक एम. के. मढवी यांच्यासह त्यांच्या पाच ते सहा सहकाऱ्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मढवी यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. 

या प्रकरणातील तक्रारदार सागर अशोक कदम (30) हा तरुण ऐरोली सेक्‍टर-14 मध्ये राहाण्यास आहे. तो 26 जून रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास विकास काळे या मित्रासह गोठीवली गावातील राजेंद्र पाटील या डॉक्‍टरांकडे गेला होता. यावेळी त्याने आपली मारुती सुझुकी कार राजेंद्र पाटील यांच्या दवाखान्यासमोर उभी केली होती. यादरम्यान, नगरसेवक एम. के. मढवी हे आपल्या कारमधून त्या ठिकाणी आले. मात्र सागर कदम याने रस्त्यावर पार्क केलेल्या कारमुळे एम. के. मढवी यांच्या कारला पुढे जाता येत नसल्याने मढवी यांनी आपल्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी क्‍लिनिकमध्ये गेलेल्या सागर कदम याला रस्त्यावरून गाडी बाजूला काढण्यासंदर्भात सुनावले. यावरून त्याची नगरसेवक एम. के. मढवी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वादावादी झाली. या वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. या हाणामारीत सागर कदम याचा हात फ्रॅक्‍चर झाल्याने त्याने रबाळे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेवक एम. के. मढवी यांच्यासह त्यांच्या पाच ते सहा सहकाऱ्यांविरोधात मारहाण करणे, धमकावणे, गर्दी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तपास सुरू असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक काळसेकर यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena corporators beat the youth