जैन मुनींच्या आशीर्वादाने पालिकेवर भगवा फडकणार, गीता जैन यांचा विश्‍वास 

संदीप पंडित
Monday, 26 October 2020

महाराष्ट्र विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर आपण भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, मागील एक वर्षाच्या काळापासून भाजपने पालिकेत मला कोणतेही सहकार्य केले नाही.

भाईंदर : जैन मुनींच्या आशीर्वादाने आगामी मिरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढविणार असून पालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा विश्‍वास शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी व्यक्त केला आहे. 

महत्वाची बातमी : राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट; आरोग्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांना दिलासा

शिवसेनेत दाखल झाल्यानंतर सोमवारी आमदार प्रताप सरनाईक आणि गीता जैन यांची एक संयुक्त पत्रकार परिषद मिरा-भाईंदर पालिकेत पार पडली. यावेळी बोलताना गीता जैन म्हणाल्या की, महाराष्ट्र विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर आपण भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, मागील एक वर्षाच्या काळापासून भाजपने पालिकेत मला कोणतेही सहकार्य केले नाही. त्यामुळे या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आपण शिवसेनेत दाखल झालो आहोत. 

हे ही वाचा : फेक टीआरपी प्रकरण! कोलवडेला पोलिस कोठडी मिश्राला जामीन; आतापर्यंत 10 जण ताब्यात 

मागील मिरा-भाईंदर पालिका निवडणुकीच्या कार्यकाळात जैन मुनींनी शिवसेना सत्तेवर आल्यास जैन मंदिरांसमोर भुर्जीपावच्या गाड्या लागतील असे सांगितले होते. याबद्दल बोलताना गीता जैन म्हणाल्या की, जैन मुनी कधीही शिवसेनेच्या विरोधात नव्हते. मुंबई आणि ठाणे येथे जैन मुनींनी नेहमीच शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शविला आहे. आता यावेळी आगामी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत याच जैन मुनींच्या आशीर्वादाने महापालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकविला जाईल. 

नक्की वाचा : वीजपुरवठा खंडित प्रकरण! ऊर्जामंत्र्यांकडून ऐरोली येथील राज्य भार प्रेषण केंद्राची पाहणी

भ्रष्टाचार वाढला
शहराच्या विकासाकरीता आगामी चार वर्षांच्या काळात भरीव कामगिरी केली जाईल, असे सांगताना मिरा-भाईंदर महापालिकेत सत्ताधारी पक्षामुळे भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

Shiv Sena flag will be hoisted on Mira Bhayander Municipal Corporation gita jain


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena flag will be hoisted on Mira Bhayander Municipal Corporation gita jain