नवी मुंबईत शिवसेनेची स्वबळाची चाचपणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

भाजपपाठोपाठ युतीमधील मित्रपक्ष शिवसेनेनेही नवी मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली. सेनेतर्फे गुरुवारी (ता. १९) ऐरोली व बेलापूर मतदारसंघाकरिता इच्छुक उमेदवारांच्या शिवसेना भवन येथे मुलाखती झाल्या.

नवी मुंबई : भाजपपाठोपाठ युतीमधील मित्रपक्ष शिवसेनेनेही नवी मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली. सेनेतर्फे गुरुवारी (ता. १९) ऐरोली व बेलापूर मतदारसंघाकरिता इच्छुक उमेदवारांच्या शिवसेना भवन येथे मुलाखती झाल्या. ऐरोली मतदारसंघातून सहा जणांनी; तर बेलापूर मतदारसंघातून दोन जणांनी उमेदवारीकरिता मुलाखती दिल्या. दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबईत शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बेलापूर मतदारसंघावर अप्रत्यक्षरीत्या दावा केला होता. यादरम्यान शिवसेनेच्या चाचपणीमुळे ‘एकला चलो रे’च्या शक्‍यतेने शिवसैनिकांचे चेहरे प्रफुल्लीत झाले आहेत. 

एकेकाळी रसातळाला गेलेल्या शिवसेनेला २०१४ च्या निवडणुकांपासून पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महापालिकेत शिवसेनेचा निसटता पराभव झाला असला, तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने ही कमी भरून काढली. खासदार राजन विचारे यांना सलग दोन वेळा नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघातून मतांची आघाडी मिळवून देऊन शिवसेनेने नवी मुंबईतील ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. यादरम्यान गणेश नाईक कुटुंबीय भाजपमध्ये आल्यामुळे नवी मुंबईतील दोन्ही जागा निसटतील, या भीतीने शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी याआधीच एका जागेवर दावा केला आहे; अन्यथा निवडणुकीचे काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

याच धर्तीवर गुरुवारी झालेल्या शिवसेना भवनातील इच्छुकांच्या मुलाखती सत्रात जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, महिला आघाडी जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, नगरसेवक एम. के. मढवी व संजू वाडे अशा सहा जणांनी ऐरोली मतदारसंघाकरिता मुलाखती दिल्या; तर बेलापूर मतदारसंघाकरिता ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर गायखे व नगरसेवक नामदेव भगत यांनी मुलाखती दिल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच भाजपनेही दोन्ही मतदारसंघात इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेतल्यानंतर मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे शिवसेनाही या निवडणुकीत एकाकी पडू नये, म्हणून चाचपणी केली जात आहे. 

पक्षाने आपल्या सर्व मतदारसंघांमध्ये चाचपणी करणे आवश्‍यक आहे. त्याप्रमाणे मुलाखती घेतल्या जात आहेत.
- विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख, शिवसेना, नवी मुंबई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena independently in Navi Mumbai