पालकमंत्रीसाठी शिवसेना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेचाच असावा, यासाठी या पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अलिबाग/ कोलाड : रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेचाच असावा, यासाठी या पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रोह्यात पक्षाची मंगळवारी बैठक झाली, त्या वेळीही हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आल्याचे समजते. पत्रकार परिषदेतही आमदारांनी हाच मुद्दा मांडला. त्यामुळे भविष्यात राज्यातील महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात येत आहे. 

महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अधिक आमदार असलेल्या पक्षाचा पालकमंत्री त्या जिल्ह्यात होणार, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे अधिक आमदार असलेल्या रायगड जिल्ह्यात शिवसेनेवर अन्याय का? असा प्रश्‍न आहे.
पत्रकार परिषदेला आमदार महेंद्र दळवी, अनिल नवगने, माजी आमदार तुकाराम सुर्वे, रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, प्रमोद घोसाळकर, प्रशांत मिसाळ, सिवसेना रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अरे बापरे! बदलीसाठी शिक्षक आजारी 

रायगड जिल्ह्यात शिवसेनेला पालकमंत्रिपद मिळायला हवे, अशी रायगड जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची भावना आहे. ती दोन-तीन दिवसांत पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त करणार आहोत, असेही गोगावले यांनी सांगितले. 

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी  घेतलेल्या आक्रमक पवित्र्याचे पडसाद या दोन्ही पक्षांतील वादात रूपांतरित होण्याची शक्‍यता जाणकार व्यक्त करत आहेत.

अरे वाह.. मुंबई ते ठाणे प्रवास आणखी वेगवान... वाचा कसे ते..

शिवसेनेचे १८ सदस्य राजीनामे देण्याच्या तयारीत
रायगड जिल्ह्यातील सातपैकी शिवसेनेचे सर्वाधिक ३ आमदार आहेत. त्यानंतरही हा पक्ष पालकमंत्री पदापासून दूर आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीमध्ये या पक्षाला वाटा मिळत नाही. त्यामुळे पक्षाच्या १८ सदस्यांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडीत घुसमट होत आहे, असे या सदस्यांसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांचे हे गाऱ्हाणे मांडण्यासाठी शिवसेनेचे आमदार, जिल्हाध्यक्ष गुरुवारी (ता.१६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडून काढून घ्यावे, अशी मागणी पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेतील सदस्यांनी एकमुखाने जिल्हा नेतृत्वाकडे केली आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या व्यथा पक्षप्रमुखांकडे मांडव्यात, अशी मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsainik Aggressive for Guardian Minister