अंबरनाथमध्ये शिवसेनेची बेरोजगारांसाठी उद्योजकांना साद 

श्रीकांत खाडे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

अंबरनाथ शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांमध्ये सहकार्य करण्याबरोबरच शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्यांत प्राधान्य देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने अंबरनाथमधील कारखानदार आणि उद्योजकांना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केली आहे. 

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांमध्ये सहकार्य करण्याबरोबरच शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्यांत प्राधान्य देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने अंबरनाथमधील कारखानदार आणि उद्योजकांना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केली आहे. 

अंबरनाथ नगरपालिका प्रशासन आणि आनंदनगर अतिरिक्त मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशन (आमा) यांची संयुक्त बैठक नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.3) आनंदनगर येथील "आमा'च्या सभागृहात झाली. शहरप्रमुख अरविंद वाळेकर, "आमा'चे अध्यक्ष उमेश तायडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे किर्लेकर, नगरपालिकेचे उप मुख्याधिकारी आरोग्याधिकारी सुरेश पाटील, नगरसेवक निखील वाळेकर, संभाजी कळमकर, प्रकाश डावरे आदी यावेळी उपस्थित होते.

अंबरनाथमध्ये नगरपालिका आणि अन्य मार्गाने शहरविकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. नोकऱ्या देताना स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्रथम प्राधान्य द्या, तसेच चौक सुशोभिकरण, उद्यानाचे सुशोभिकरण यासारख्या कार्यात देखील उद्योजकांचे सहकार्य अपेक्षित आहे. यामुळे शहर विकासाला योग्य दिशा मिळेल असा दावा अरविंद वाळेकर यांनी केला. 

शहरातील चौक सुशोभिकरण करणे, ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी हिरवे-निळे डबे पुरवणे यासारख्या कामांसाठी सरकारच्या धोरणानुसार सीसीआर निधीचा वापर करावा, याशिवाय नोकऱ्या देताना स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही याकडे कारखानदारांनी लक्ष देण्याची मागणी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी केली. शहरविकास कार्यात संघटनेतर्फे विशेष लक्ष पुरवण्यात येईल. एमआयडीसीमध्ये स्वच्छता ठेवण्याबाबत खबरदारी घेतली जाईल, प्रसंगी गस्त मोहीम राबवू. नोकऱ्या देतानाही स्थानिकांचा विचार करण्याचे आश्वासन आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena appeal to businessmen give job for unemployed