दसरा मेळाव्यातून आज शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

या मेळाव्याला शिवसेना नेते आणि वरळी मतदारसंघातील उमेदवार आदित्य ठाकरे हे प्रथमच उपस्थित राहणार आहेत. आदित्य हे निवडणूक लढवणारे पाहिले ठाकरे असल्याने ते दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करण्याची दाट शक्‍यता आहे.

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज (ता. 8) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळावा आल्याने शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता असून या मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकतील. आदित्य ठाकरेंचा निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश झाल्यानंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा होत असल्याने या मेळाव्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

शिवसेनेत दसरा मेळाव्याला फार महत्त्व आहे. या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आपल्या वाटचालीची पुढील दिशा स्पष्ट करतात. राज्यभरातील शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी दादरमध्ये दाखल होणार आहेत. यावेळी शिवाजीपार्क मैदानात विक्रमी गर्दी होईल असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. कलम 370, शेतकरी कर्जमाफी आणि पीकविमा, आरे वृक्षतोड या विषयांना उद्धव ठाकरे हात घालण्याची शक्‍यता असून शिवसेनेतील बंडोबांना ते काय इशारा देतात याकडेही लक्ष असेल. 

या मेळाव्याला शिवसेना नेते आणि वरळी मतदारसंघातील उमेदवार आदित्य ठाकरे हे प्रथमच उपस्थित राहणार आहेत. आदित्य हे निवडणूक लढवणारे पाहिले ठाकरे असल्याने ते दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करण्याची दाट शक्‍यता आहे.

आदित्य यांचा राजकारणातील प्रवेश उद्धव यांच्या अनुपस्थित आणि अत्यंत सध्या पद्धतीने झाल्याने दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंना "प्रोजेक्‍ट' करण्यावर शिवसेना अधिक जोर देणार असल्याचे समजते. यामुळे या दसरा मेळाव्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Dussehara Melava in Mumbai