esakal | शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडले - प्रसाद लाड
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Prasad Lad

शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडले - प्रसाद लाड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : "काँग्रेसमध्ये केवळ घराणेशाहीला वाव आहे. काँग्रेसमध्ये (Congress) वर्षानुवर्षे तेच नेते एका जागी ठाण मांडून आहेत. त्यामुळे तरुण पिढी (youngsters) काँग्रेसपासून दूर जात आहे, ती जोडली जात नाही. जो स्वकर्त्वृत्वाने मोठा होतो, त्याचे पंख छाटण्याचे काम काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे अनेक नेते पक्ष सोडून जात असल्याचे दिसते. भाजपमध्ये (BJP) मात्र सर्वांना जोडण्याचे काम होते. इथे कोण आतला, कोण बाहेरचा, हे पाहिले जात नाही" असे भाजपचे राज्य उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी सांगितले. ‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमात (Coffee with Sakal) त्यांनी विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. (Shivsena ignore at kokan region prasad lad bjp )

ओबीसींच्या मुद्द्यांवर भाजप कटिबद्ध

भाजपमध्ये अगदी पूर्वीपासून सर्व जाती-धर्मातील लोक काम करतात. भाजप ओबीसींचा पक्ष म्हणूनच ओळखला जातो. आताही भाजप ओबीसींच्या आंदोलनात त्यांच्यासोबत आहे; मात्र शिवसेना आरक्षणाच्या मुद्द्यावर कधीच बाहेर पडली नाही. आता मात्र ओबीसींच्या विषयावर राजकारण केले जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय समिती तयार करण्याची मागणी आम्ही केली. महाविकास आघाडीला दीड वर्षात एम्पिरिकल डेटा देता आला नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने कंटाळून आरक्षणाच्या विरोधात निर्णय घेतला. आज छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आदी नेते ओबीसी आरक्षणावर बोलत आहेत. त्यांनी राजीनामे द्यावेत आणि आमच्याकडे यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू. आम्ही आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करू.

हेही वाचा: मुंबईत उद्यापासून गर्भवती महिलांचे लसीकरण, ३५ केंद्रांची माहिती जाणून घ्या

पंकजा मुंडे नाराज नाहीत

पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार असल्या, तरी त्या कर्तृत्ववान आणि सक्षम आहेत. राज्यात नेतृत्व करणाऱ्या पहिल्या पाच नेत्यांमध्ये पंकजा मुंडे आहेत. त्यांच्यासाठी पक्षाने नक्कीच काही तरी मोठा विचार केलेला असणार. त्या अजिबात नाराज नाहीत. भाजपमध्ये त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही आणि होणार नाही. आपला नेता मोठा व्हावा, असे कार्यकर्त्यांना नेहमीच वाटते. तसे पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटणे गैर नाही. पंकजा मुंडे आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढतील, हे निश्चित. त्याशिवाय ज्यांना पक्षाने संधी दिली नाही, त्यांच्याकडे वेगळी मोठी जबाबदारी दिली आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. ते जोमाने काम करत आहेत.

शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडले

कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले. कोकणच्या जीवावरच शिवसेना राज्यात सत्तेवर आली; मात्र शिवसेनेने कोकणाला काहीही दिले नाही. किंबहुना शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडले. त्यामुळे कोकणातील शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. अनिल परब कोकणात फिरकत नाहीत. ज्या कोकणात शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसेनेने एकही कोविड केंद्र उभे केले नाही. भाजपने कोकणात आतापर्यंत ११ कोटी ५६ लाख रुपयांची मदत केली आहे.

फडणवीसांच्या काळात मुंबईचा विकास

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मुंबईसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या. मेट्रोसह जलवाहतूक, सुधारित टॅक्सी योजना, रेल्वे स्टेशन कनेक्टिव्हिटी यांसारख्या अनेक योजना त्यांनी आखल्या. शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकला परवानगी, नवी गृहनिर्माण योजनांना परवानग्या मिळवून दिल्या. मेट्रोच्या आरे कारशेडचा भाजप सरकारने घेतलेला निर्णय योग्य होता. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही निर्णय दिला होता. त्यात आडकाठी आणणे योग्य नाही. हे राज्याच्या हिताचे नाही. आरे वसाहतीतील कारशेड हाच योग्य पर्याय आहे.

हेही वाचा: 'म्हाडा' व 'एचडीएफसी लिमिटेड' यांच्यात झाला 'हा' करार

नारायण राणेंमुळे भाजपची ताकद वाढली

नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना सर्व प्रश्नांची जाण आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्यांना ताकद दिली आहे. संपूर्ण राज्यात त्यांना मानणारा वर्ग आहे. त्याचा फायदा भाजपला नक्की होईल.

लोकल सुरू व्हावी

सर्व मुंबई अनलॉक होत आहे. सर्व व्यवहार सुरू झाले आहेत; मग सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासबंदी कशासाठी? लोक बसने प्रवास करतात, सर्व वाहनांना परवानगी आहे, मग रेल्वे प्रवासाला बंदी का? ही बंदी लवकरात लवकर उठवून रेल्वे सर्वांसाठी सुरू करायला हवी.

लसीकरणाच्या नियोजनात आपण एक नंबर

केंद्र सरकारने लशींचे नियोजन योग्य प्रकारे केले आहे. राज्यांना आवश्यक तेवढे डोस दिले जात आहेत. राज्यांना निर्धारित कोटा मिळत नाही हा आरोप अयोग्य आहे. राज्याने लाखो लशी फुकट घालवल्या आहेत. याला दोषी कोण? केंद्राचे राज्यासोबत शत्रुत्वाचे धोरण नाही. केंद्र सरकार योग्य काम करत असून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण देशाच लसीकरण करणार असल्याचे नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून त्यात ते यशस्वी होतील. केंद्राने सर्व व्यवस्थेत पारदर्शकता आणली असून रोजगारातील काळाबाजाराला ही चाप लावला आहे.

नामकरणापेक्षा विमानतळ होणे महत्त्वाचे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून रंगलेला वाद दुर्देवी आहे. नावापेक्षा ती वास्तू लवकर उभी राहणे महत्त्वाचे आहे. लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे. लोकांना सुविधा देणे महत्त्वाचे आहे.

loading image