आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी सेना लोकप्रतिनिधींची रांग; आगळ्यावेगळ्या प्रकल्पांसाठी मागणी

आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी सेना लोकप्रतिनिधींची रांग; आगळ्यावेगळ्या प्रकल्पांसाठी मागणी

मुंबई  ः एकीकडे तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या गोंधळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे आपली कामे होत नसल्याची तक्रार शिवसेनेचे लोकप्रतिनिधी करीत आहे. तर दुसरीकडे सेनेच्या काही लोकप्रतिनिधींनी या गोंधळात न पडता थेट युवासेनाप्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आपल्या समस्या मांडायला सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे कोणत्याही खात्याच्या समस्या मांडल्या तरी त्याची त्वरेने दखल घेतली जाते याचा अनुभव येत असल्याने आता अशा लोकप्रतिनिधींची संख्या वाढते आहे. 

नुकतेच मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी नॅशनल पार्क मधील आदिवासींच्या प्रलंबित समस्या तसेच मतदारसंघातील अन्य प्रश्न ठाकरे यांच्यासमोर मांडले होते. त्यानंतर ठाकरे यांनी या प्रश्नांबाबत बैठका घेऊन ते प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आता दहिसर मधील नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनीही संपूर्ण दहीसरच्या समस्या आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. यात कचऱ्यापासून वीजनिर्मिती, उर्जानिर्मितीची माहिती देणारे एनर्जी पार्क, कांदळवन उद्यान, दहीसर नदीची संरक्षक भिंत, अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनांचा समावेश आहे. 

कचऱ्यापासून वीजनिर्मिती
कांदरपाडा स्मशानभूमीजवळ कचरा वर्गीकरण प्रकल्प आहे. तेथे ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे प्रलंबित आहे. त्याला निधी मंजूर करून तो मार्गी लावण्याची विनंती यावेळी करण्यात आली. गणपत पाटील नगर या मोठ्या झोपडपट्टीत पक्के रस्ते नाहीत, तेथे मातीच्या पायवाटा आहेत, स्वच्छतागृहे नाहीत, पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी गटारे नाहीत. या सोयी करण्याची मागणीही श्रीमती घोसाळकर यांनी केली. 

दहिसर नदी संरक्षण भिंत
दहीसर नदीच्या संरक्षक भिंतीच्या काही भागांचे काम कांदळवनामुळे अडले आहे. या कामासाठी संबंधित खात्यांनी परवानगी दिल्यास पुराचा धोका कमी होईल, असेही दाखवून देण्यात आले. 

उर्जानिर्मितीची माहिती 
शहीद तुकाराम ओंबळे मैदानात एनर्जी पार्क करण्याबाबत प्रस्ताव महानगरपालिकेकडे देण्यात आला आहे. येथे शैक्षणिक व सामाजिक जनजागृतीसाठी ऊर्जानिर्मितीबाबतची माहिती, त्याचे फायदे तोटे व स्वच्छ उर्जेची माहिती दिली जाईल. या आगळ्यावेगळ्या पर्यटन प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे आराखडा उपलब्ध करून देण्याची मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली.

कांदळवन उद्यान 
दहिसरच्या पश्चिम विभागात कांदळवन उद्यान स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे, तेथे कांदळवनही लावले जाईल तसेच कांदळवनांबाबत जनजागृतीही केली जाईल. पर्यावरण साखळीतील कांदळवनांचे महत्व व त्यांच्याअभावी पर्यावरणाची तसेच जीवसृष्टीची होणारी हानी याबाबत येथे येणाऱ्या निसर्गप्रेमींना माहितीही दिली जाईल. महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाकडून हा प्रकल्प, निसर्ग पर्यटन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याला संबंधित परवानग्या मिळाल्याने त्याचे काम त्वरेने पूर्ण करण्याच्या सूचना देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

shivsena karyakarte and representatives queue for Aditya Thackerays visit Demand for unique projects

---------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com