नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली; मुहूर्त कोणी मांडू नयेत, शिवसेनेचा भाजपवर पलटवार

नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली; मुहूर्त कोणी मांडू नयेत, शिवसेनेचा भाजपवर पलटवार

मुंबईः  गेल्या आठवड्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीचे भाष्य केले होते. यावर आता शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं या वक्तव्यावर पलटवार केला आहे. 

पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात पहाट योग एकदाच आला आणि तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.

आजच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे 

  • राज्याच्या राजकारणात ‘वन फाइन मॉर्निंग’ अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तविल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वगैरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाइन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, चंद्रकांतदादांना फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असे वाटते. हे काही चांगल्या प्रकृतीचे ‘साइन’ नाही. 
  • देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्या अचानक भेटीनंतर जो गदारोळ झाला त्यामुळे एखाद्या फाइन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. एकतर अशा फाइन मॉर्निंगचा अचानक प्रयोग भाजपने याआधी केलाच आहे, पण त्या फाइन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या 72 तासांत दुरुस्त झाले. याचे भान सध्या फक्त देवेंद्रबाबूंनाच आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही व हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत व त्याचवेळी एखाद्या फाइन मॉर्निंगला ‘काहीतरी’ घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचे?
  • फडणवीस-राऊत भेटीत राजकारण नव्हते. ती एक सहज भेट होती याबाबत दोघांनी खुलासे केले. मुळात ती गुप्तभेट नव्हती. शिवसेनेत कोणीच ‘गुप्तेश्वर’ नसल्याने ताकाला जाऊन भांडे लपवण्याचे कारण नाही. शिवसेनेचा तो स्वभाव नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे व सध्याचे सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. अशी शंका देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही नाही, पण चंद्रकांतदादांना पहाटे पहाटे सध्या जाग येत आहे. त्यांची झोपमोड होते की, ते दचकून गचकन जागे होतात यावर पुढचे बरेच काही अवलंबून आहे. 
  • आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे. असा आध्यात्मिक विचारही दादांनी पहाटेनंतरच्या सूर्योदयास मांडला आहे. म्हणजे या मंडळींच्या डोक्यात काहीतरी वळवळते आहे. मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर ‘घडाळय़ा’चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. सोबतीला हात आहे. हातावर घड्याळ आहे व घडय़ाळातून पहाटेचा गजर काढून टाकला आहे. अजित दादांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घड्याळ भिंतीवर लावले आहे व ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळे सगळेच ‘जागते रहो’च्या भूमिकेत आहेत. टोल्यांच्या आवाजामुळे भाजपच्या दादांची पहाट खराब होत असेल तर तो त्यांचा प्रश्न.
  • 'सरकार आणि विरोधी पक्षांत या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी व अशी चर्चा ठरवून पहाटे पहाटे झाली तरी हरकत नसावी. राज्यात प्रश्नांचे डोंगर निर्माण झाले असताना राजकारणात उगाच फुसकुल्या सोडून प्रदूषण निर्माण करणे हे प्रगल्भतेचे लक्षण नाही. पाच वर्षे राज्य फडणवीस-पाटलांनीही चालवले आहे. त्यामुळे संकटकाळात काय करायचे व काय नाही याचे भान त्यांना असायला हवे' अशी आठवणही सेनेनं करून दिली.
  • भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष आहे व आज महाराष्ट्राचे भाजप सर्वेसर्वा म्हणून फडणवीस यांच्याकडेच पाहिले जाते. पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. शांत झोप लागणे हे ‘फाइन’ प्रकृतीचे लक्षण आहे. कधीच पूर्ण न होणाऱ्या स्वप्नांचा पाठलाग करणे हे कायम अशांत राहणाऱ्या मनाचे लक्षण आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे.

Shivsena saamana editorial bjp chandrakant patil devendra fadnavis maha vikas aghadi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com