'अॅड आंबेडकरांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल', शिवसेनेचा टोला

पूजा विचारे
Tuesday, 1 September 2020

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पंढरपुरात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनावर शिवसेनेनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून हा टोला लगावण्यात आला आहे. 

मुंबईः अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पंढरपुरात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनावर शिवसेनेनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेनं आंबेडकर यांच्या पंढरपूर आंदोलनाचं स्वागत करत काही टोलेही लगावलेत. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून हा टोला लगावण्यात आला आहे. 

या अग्रलेखात संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर आणि भाजपचं साटंलोटं असल्याच्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचंही म्हटलं आहे. सरकारच्या मनात कोरोनासंदर्भात भीती आहे आणि ती रास्त आहे. इतके असूनही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पंधरा सहकाऱ्यांना विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली. अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘नामदेव पायरी’चेही दर्शन घेतल्याचे समजते. देह विसर्जन करण्यासाठी नामदेव पंढरीला आले आणि विठ्ठलाच्या महाद्वारी त्यांनी समाधी घेतली. तीच ‘नामदेवाची पायरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केला, असा टोला शिवसेनेने आंबेडकरांना लगावला आहे. 

अधिक वाचाः  ना ढोल...ना ताशा...ना डीजे; विघ्नहर्त्याचे विसर्जन यंदा नियमांच्या चौकटीत

प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात नामदेव पायरीचंही दर्शन घेतलं. नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलींचे दर्शन घेऊन केला. कपाळाला बुक्का, चंदन लावून आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावलं हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचं स्वागतच करावं लागेल, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. 

हेही वाचाः  एक्स्प्रेस अंगावरून जाऊनही महिला सुखरुप, पोलिसांच्या सतर्कतेने आत्महत्येचा प्रयत्न फसला

मंदिरा संदर्भात प्रकाश आंबडेकर यांनी केलेल्या आंदोलनाचा संबंध भाजपच्या घंटानादाशी जोडला जातो. हा निव्वळ योगायोग समजायला हवा. आंबेडकर आणि भाजपचे आतून साटेलोटे आहे, असा आरोप नेहमी केला जातो. त्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही. लोक दहा तोंडांनी बोलतात आणि शंभर कानांनी ऐकतात त्याला इलाज नाही, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

अग्रलेखातील काही महत्त्वाचे मुद्दे

  • मंदिरांसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनाचा संबंध भाजपच्या घंटानादाशी जोडला जातो, हा निव्वळ योगायोग समजायला हवा. अ‍ॅड. आंबेडकर आणि भाजपचे आतून साटेलोटे आहे, असा आरोप नेहमी केला जातो. त्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही. लोक दहा तोंडांनी बोलतात आणि शंभर कानांनी ऐकतात त्याला इलाज नाही.
  • महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठाई माऊली आहे. जनतेचा, सरकारचा माऊलीशी थेट संबंध आहे. त्यामुळे जे लोक आज मंदिरात घुसण्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांनी सरकार आणि देवांत भांडण लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. जगात भांडल्यावाचून काही मिळत नाही. परमेश्वराशीदेखील भक्ताला भांडावे लागले; पण इथे सरकारविरोधी पुढारीच मंदिराबाहेर उभे राहून भक्तांना भांडण्याचे उत्तेजन देत आहेत.
  • मंदिरे उघडणार नाहीत किंवा मंदिरात कोणाला प्रवेश दिला जाणार नाही असे कधीच कोणी जाहीर केलेले नाही. मंदिरे उघडण्याची ही वेळ नाही इतकेच सरकारने सांगितले. यावर वारकरी संप्रदायाचे प्रमुख लोक थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू शकतात. अ‍ॅड. आंबेडकरांच्या मंदिर प्रवेश आंदोलनाला भाजप नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला. हे त्रांगडे कधी सुटेल असे वाटत नाही.

shivsena saamana editorial reaction prakash ambedkar protest pandharpur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena saamana editorial reaction prakash ambedkar protest pandharpur