Shivsena Vs BJP : महापालिका निवडणुकीनंतर विधानसभेत पाहायला मिळणार वादाचा कळसाध्याय ?

कृष्ण जोशी
Tuesday, 19 January 2021

वर्षभराने होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दहीसरमध्ये शिवसेना-भाजप यांच्यातील सूप्त वादाने आता उघड स्वरुप धारण केले आहे.

मुंबई : वर्षभराने होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दहीसरमध्ये शिवसेना-भाजप यांच्यातील सूप्त वादाने आता उघड स्वरुप धारण केले आहे. महापालिका निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत या वादाचा कळसाध्याय दिसून येईल अशी चिन्हे आताच दिसू लागली आहेत. 

दहीसर हा शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला होता व घोसाळकर कुटुंबियांचे येथे वर्चस्व होते. मात्र 2009 च्या मोदी लाटेत युती तुटल्याने भाजपने हा मतदारसंघ हिसकावून घेतला. 2014 च्या निवडणुकीपर्यंत युती असली तरी मनाने या दोनही पक्षांचे नेते कधीच एकत्र आले नव्हते. कधी दरेकर बंधूंशी तर कधी भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्याशी घोसाळकर कुटुंबियांची धुसफूस सुरूच होती. पण आता अधिकृतपणे सेना भाजप युती तुटल्यानंतर हे वाद जाहीरपणे समोर येऊ लागले आहेत. नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या गणपत पाटील नगरवासियांनी वीज देण्याविरोधात आहेत, असा आरोप करत आमदारांनी मोर्चाही काढला होता. त्याला आता घोसाळकर कुटुंबियांनी जाहीर प्रत्युत्तर दिले असून आता पालिका निवडणुक व नंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अशा चकमकी वारंवार होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप यांच्यात युती होणार नसल्याने हे वाद वाढण्याची चिन्हे आहेत. 

महत्त्वाची बातमी : 'तांडव' विरोधात भाजप पुन्हा आक्रमक, ठिय्या आंदोलन करणाऱ्या राम कदम पोलिसांच्या ताब्यात

गणपत पाटील नगर या झोपडपट्टीत वीज, पाणी, स्वच्छतागृहे या सुविधा श्रीमती घोसाळकर यांनी दिल्या आहेत. पण उलट भाजपच्या लोकप्रतिनिधींनी येथे काहीही काम केले नाही, कोरोना काळात तर त्यांची तोंडेही कोणी पाहिली नाहीत. केवळ शिवसेनाच येथील लोकांसाठी धाऊन आली, असा दावा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी या सुविधांच्या लोकार्पण कार्यक्रमात केला. एक कोटी रुपये खर्च करून महापालिका येथे बांधत असलेल्या साठ आसनी दुमजली स्वच्छतागृहाचे भूमीपूजन यावेळी झाले.  

भाजपकडे दाखविण्यासारखी विकासकामे नसल्याने ते शिवसेनेवर खोटे आरोप करीत आहेत. उलट किरकोळ सुविधांसाठी भाजप कार्यकर्तेच नागरिकांकडून हफ्ते घेत आहेत, असाही आरोप घोसळकर यांनी केला. तर अशा जनाधार नसलेल्या भाजप नेत्यांपासून सावध रहा, असा सल्ला माजी आमदार व म्हाडा चे सभापती विनोद घोसाळकर यांनी नागरिकांना दिला. गणपत पाटील नगराचा विकास शिवसेना करणार असून त्यासाठी या विभागाला झोपडपट्टी घोषित करून सोयीसुविधा दिल्या जातील असेही त्यांनी जाहीर केले.

shivsena vs bjp after municipal corporation election fights between parties may increase


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena vs bjp after municipal corporation election fights between parties may increase