
विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण दाखवत ट्रक चालकांची लूट करायला सोकावलेले भ्रष्टाचारी सरकारी नोकर देशातल्या ट्रक चालकांच्याकडून दरवर्षी तब्बल 48 हजार कोटी रुपयांची लाच वसूल करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबई : विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण दाखवत ट्रक चालकांची लूट करायला सोकावलेले भ्रष्टाचारी सरकारी नोकर देशातल्या ट्रक चालकांच्याकडून दरवर्षी तब्बल 48 हजार कोटी रुपयांची लाच वसूल करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
भारतातल्या ट्रक चालकांच्या स्थितीवर केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन विभागाला सादर केलेला हा महत्त्वपूर्ण अहवाल 'सेव्ह लाईफ' या संस्थेने मुंबईसह दिल्ली, बाह्य दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, बेंगळुरू, जयपूर, अहमदाबाद, विजयवाडा, कानपूर, गुवाहाटी या महत्त्वाच्या शहरात 1200 ट्रक चालकांच्याकडून आणि शंभरपेक्षा अधिक ट्रकद्वारे देशभरात वाहतूक करणार्या कंपन्यांच्या मालकांकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे तयार केला आहे. तो महामार्गावरील वास्तव दर्शवणारा असल्याचे मान्य करून रस्ते परिवहन खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सरकारला सादर केला आहे.
मुंबईची कॉलर टाईट ! धारावी पॅटर्नचा जगभरात डंका, आता फिलिपिन्सने मागवली ब्लु प्रिंट..
देशभरात विविध मालाची वाहतूक करणार्या 83 टक्के ट्रक चालकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंधित खात्यांना लाच द्यावीच लागते.पंधरा वर्षापूर्वीच्या 'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' या संस्थेच्या अहवालात भारतात ट्रक चालकांकडून 22 हजार कोटी रुपयांची लाच उकळली जात असल्याची माहिती देेण्यात आली होती. आता या नव्या अहवालातल्या तपशिलानुसार लाचेचा हा आकडा दुपटीपेक्षा अधिक झाला आहे.माल वाहतूक करणार्या प्रत्येक ट्रक चालकाला दरवर्षी 80 हजार रुपयांची लाच द्यावी लागते.
गेल्या पंधरा वर्षात रस्त्यावरून मालवाहतूक करणार्या मालमोटारींच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. ट्रक चालकांना वाहतूक आणि परिवहन खात्याच्या तपासणी कर्मचार्यांना लाच दिल्याशिवाय वाहतूकच करता येत नाही आणि ते शक्यही नाही, असे माल वाहतूकदार ट्रक चालक संघटनेचे म्हणणे आहे. तीनशे किलोमीटर अंतरात रस्त्यावर एका ट्रक चालकाला ६ हजार रुपयांची लाच द्यावी लागते. ट्रक ड्रायव्हर कमी शिकलेले असल्याने त्यांना वाहतुकीचे नियम फारसे माहीत नसतात. परिणामी वाहतूक खात्याच्या पोलीस आणि परिवहन खात्याच्या कर्मचार्यांनी गाडी थांबवताच मागितलेली लाच द्यावीच लागते. त्याशिवाय ट्रक पुढे नेता येत नाही, ही वस्तुस्थिती देशभर कमी अधिक प्रमाणात पहायला मिळते.
ट्रक चालकांना उत्तम प्रशिक्षित केल्याशिवाय आणि लाचखोरांच्या विरुद्ध कडक कायदे अंमलात आणल्याशिवाय महामार्गावरच्या या महालाचखोरीच्या धंद्याला लगाम लागणार नाही.
-रवींद्रकुमार जाधव,
सामाजिक विश्लेषक
--------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )