धाडसी तनिशवर शिवसेनेतर्फे कौतुकाचा वर्षाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

घरात चोरी करून पळणाऱ्या चोराच्या हातात आईचा हार दिसल्याने सर्व बळ एकवटून विरारमधील ११ वर्षांच्या तनिष प्रकाश महाडिक या चिमुरड्याने चोरट्याच्या अंगावर झडप घेऊन हार हिसकावून घेण्यात यश मिळवले.

नालासोपारा (बातमीदार) : घरात चोरी करून पळणाऱ्या चोराच्या हातात आईचा हार दिसल्याने सर्व बळ एकवटून विरारमधील ११ वर्षांच्या तनिष प्रकाश महाडिक या चिमुरड्याने चोरट्याच्या अंगावर झडप घेऊन हार हिसकावून घेण्यात यश मिळवले. एवढेच नाही, तर त्याच्यामुळे चोराला पकडण्यातही यश आले. तनिषच्या या धाडसाची तत्काळ दखल घेऊन, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांनी गुरुवारी (ता.२२) तनिषचे घर गाठून सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन त्याला सन्मानित केले. 

विरार पश्‍चिम एम. बी. इस्टेटमध्ये तपोवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर प्रकाश महाडिक कुटुंबासोबत राहतात. मंगळवारी दिव्या महाडिक दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा मुलगा तनिष घरात होता. घरात मोठे कोणी नसल्याचे पाहून चोरटा घरात शिरला होता, त्याने तनिषला धमकावून गप्प बसायला सांगितले. तो घरातील सोन्याचे दागिने घेऊन जात होता. पण चोराच्या हातात तनिषला आईचा सोन्याचा हार दिसला आणि त्याने आरडाओरडा करत चोरट्याच्या हातातून हार हिसकावून घेतला. तेवढ्यात त्याची आईही आली. या दोघांनाही धक्का मारून चोरटा फरार झाला होता. पण लोकांनी त्याला शोधून पकडले.

गुन्हेगारांना सळो की पळो करणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी तनिषच्या या धाडसाची बातमी वाचून त्याचा, त्याच्या आई-वडिलांचा सन्मान करा, असा आदेश दिला होता. त्यावरून आम्ही त्याच्या घरी जाऊन शर्मा साहेबांचा फोटो असलेले सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव केला. 
- प्रमोद दळवी, संघटक, शिवसेना, नालासोपारा विधानसभा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shower of praises on brave boy Tanish