esakal | अधिकृत राजकीय प्रवेशापूर्वीच प्रचाराचा श्रीगणेशा
sakal

बोलून बातमी शोधा

नालासोपारा ः प्रदीप शर्मा यांचे छायाचित्र असलेले टी-शर्टचे गोविंदा पथकांना वाटप करताना शिवसेना कार्यकर्ते.                  (छायाचित्र ः विजय गायकवाड)

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा पोलिस अधिकारीपदाचा राजीमाना मंजूर झाला नसताना, त्यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेशही झाला नसताना ते नालासोपारा विधानसभेतून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत शिवसेना कार्यकर्त्यांकडून मिळत आहेत.

अधिकृत राजकीय प्रवेशापूर्वीच प्रचाराचा श्रीगणेशा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा (बातमीदार) : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा पोलिस अधिकारीपदाचा राजीमाना मंजूर झाला नसताना, त्यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेशही झाला नसताना ते नालासोपारा विधानसभेतून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत शिवसेना कार्यकर्त्यांकडून मिळत आहेत. दहीहंडी, गणपती या सार्वजनिक उत्सवात त्यांचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकत असल्याने शर्मा यांच्या अधिकृत राजकीय प्रवेशाआधीच त्यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा झाल्याचे बोलले जात आहे. याचाच भाग म्हणून गोविंदा पथकांना प्रदीप शर्मा यांचे छायाचित्र असलेल्या भगव्या रंगाचे बावीस हजार टी-शर्टचे वाटण्यात आले आहेत.

प्रदीप शर्मा यांची नालासोपारा विधानसभेत एंट्री होण्याआधीच कार्यकर्त्यांनी मात्र विविध उपक्रमांच्या माध्यमातून एकप्रकारे त्यांच्या प्रचाराचा नारळच फोडला आहे. मात्र याबाबत स्वतः शर्मा यांच्याकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका गुलदस्त्यातच असल्याने येथील नागरिकांमध्ये ते उभे राहणार की नाही, याविषयी उत्सुकता आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना शह देण्यासाठी आणि उत्तर भारतीयांच्या मतांची संख्या लक्षात घेऊन विधानसभेसाठी शर्मा यांना नालासोपाऱ्यातून उतरविण्याची तयारी शिवसेना करत आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शर्मा यांची प्रचारयंत्रणा नालासोपारा विधानसभेत सक्रिय झाली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, लोकांची जनमत चाचणी घेण्यात येत आहे. पी. एस. फाऊंडेशनतर्फे पावसाळ्यात त्यांचे छायाचित्र असलेल्या छत्र्यांचे वाटप केले. आता त्यांचे बॅनर लागत असून टी-शर्टचेही वाटपही सुरू आहे. त्यामुळे शर्मा नालासोपाऱ्यातून निवडणूक लढविणार, हे निश्‍चित झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

बहुजन विकास आघाडीचे मौन
एकीकडे प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असताना सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने मात्र याबाबत मौन बाळगले आहे. सध्या प्रदीप शर्मा शासकीय सेवेतच असल्याने त्यांच्याविषयी आम्ही कोणतेही राजकीय भाष्य करणार नसल्याचे नवनिर्वाचित महापौर प्रवीण शेट्टी यांनी महापौरपदाचा अर्ज भरल्यानंतर सांगितले होते. तर नालासोपाऱ्यात दहीहंडी उत्सवात कितीही बॅनर लावले, तरी शेवटचा थर कुणाचा आणि हंडी कोण फोडणार, हे फक्त बविआचे हितेंद्र ठाकूरच ठरवणार, असा टोला परिवहन सभापती प्रीतेश पाटील यांनी कुणाचेही नाव न घेता मारला.

कोकणवासीयांना १०० रुपयांत गणेश दर्शन!
नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी, पालघर जिल्हा सचिव हेमंत पवार, विरार उप-शहरप्रमुख उदय जाधव यांच्याकडून थेट त्यांचा प्रचार सुरू आहे. नालासोपारा विधानसभेतील कोकणवासीयांसाठी त्यांच्याकडून १०० रुपयात गणपतीचे दर्शन तिकीट योजना राबवून बस सोडण्यात येणार आहेत. प्रदीप शर्मा यांच्या नावाच्या बॅनरखाली नोंदणीसाठी स्टॉल लावण्यात आले आहेत.

वसई-विरार नालासोपाऱ्यात गत तीन दशकांपासून बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. पण या ठिकाणी अपेक्षित विकास न झाल्याने येथील जनतेला आता बदल अपेक्षित आहे. तो बदल आता प्रदीप शर्मा निश्‍चित घडवून आणतील. त्यासाठी सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
- प्रमोद दळवी, विधानसभा संघटक, शिवसेना, नालासोपारा

loading image
go to top