माथेरानमध्ये शटल सेवा लवकरच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

माथेरानमध्ये गेल्या चार महिन्यांत जोरदार अतिवृष्टी झाली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शटल सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आली. ती सुरू करण्यासाठी माथेरानकरांनी वारंवार पाठपुरावा केला होता. नोव्हेंबर महिन्यात नवीनच रुजू झालेले विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी भेट घेतली. यावर शटल सेवा सुरू करण्याबाबत आपण सकारात्मक असून लवकरच शटल सेवा सुरू केली जाईल, असे प्रतिपादन विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी केले.

माथेरान: माथेरानमध्ये गेल्या चार महिन्यांत जोरदार अतिवृष्टी झाली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शटल सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आली. ती सुरू करण्यासाठी माथेरानकरांनी वारंवार पाठपुरावा केला होता. नोव्हेंबर महिन्यात नवीनच रुजू झालेले विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी भेट घेतली. यावर शटल सेवा सुरू करण्याबाबत आपण सकारात्मक असून लवकरच शटल सेवा सुरू केली जाईल, असे प्रतिपादन विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी केले. या वेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे, आमदार महेंद्र थोरवे यांचे सचिव बालाजी फेरे तसेच बांधकाम सभापती प्रसाद सावंत हे उपस्थित होते.

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ११ जून रोजी बंद झाली; तर ९ ऑगस्टला शटल सेवा बंद केली. दरम्यान, रेल्वे मार्गातील दरडी काढण्याचे काम पूर्ण झाले आहे; तर काही ठिकाणी रेल्वेरुळाखालची जमीन वाहून गेली आहे. ते दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. याबाबत मी दररोज या कामाविषयी माहिती घेत आहे, असे गोयल यांनी सांगितले. माथेरानची मिनी ट्रेन ही भारतासाठी अभिमानास्पद असून आमच्यासाठी ही खास आहे, असे ते पुढे म्हणाले.

एलईडी लाईटसाठी परवानगी
खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठपुरावा करून अमन लॉज-माथेरानदरम्यान रेल्वेच्या बाजूला असलेल्या जागेवर पेव्हर ब्लॉक बसवून पर्यटकांना चालण्यायोग्य बनविण्यासाठी लवकरच काम सुरू होणार असल्याचे चर्चेदरम्यान सांगण्यात आले. इंदिरा गांधी नगर ते अहिल्याबाई होळकर चौकादरम्यान एलईडी लाईट बसविण्यासाठी नगरपालिकेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री येणाऱ्या पर्यटकांना ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितले. तसेच नाताळ सुरू होण्यापूर्वी शटल सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेसुद्धा प्रेरणा सावंत यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shuttle service in Matheran soon