भाईंदरमध्ये राजकीय बदलाचे संकेत; भाजपमधून राष्ट्रवादीत इनकमिंग वाढणार

संदीप पंडित
Monday, 30 November 2020

 मधल्या काळात पहिल्यांदा गिल्बर्ट मेंडोसा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि ते शिवसेनेत दाखल झाले; तर त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपला जवळ केले.

भाईंदर ः मिरा-भाईंदर हा एके काळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. या किल्ल्याचे किल्लेदार होते ते गिल्बर्ट मेंडोसा; परंतु मधल्या काळात पहिल्यांदा गिल्बर्ट मेंडोसा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि ते शिवसेनेत दाखल झाले; तर त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपला जवळ केले. त्यामुळे एके काळी मिरा भाईंदरमध्ये शक्तिशाली असणाऱ्या राष्ट्रवादीला घरघर लागली; मात्र राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यापासून भाईंदरमधील राजकीय चित्र बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये चढाओढ होत असल्याचे पाहवयास मिळत आहे; तर शिवसेनेदेखील इनकमिंग करण्याची संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दुधाचा टॅंकर उलटला; महामार्गावर वाहनांचा खोळंबा

भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष मोहन पाटील, जयंत पाटील, शांताराम ठाकूर, माजी महापौर निर्मला सावळे, अंकुश मालुसरे यांच्यासारख्या दिग्गजांनी नुकतीच मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपमध्ये गेले होते ते पुनः एकदा राष्ट्रवादीकडे येऊ लागल्याच्या चर्चांना सध्या भाईंदरमध्ये उधाण आले आहे. मात्र त्याविषयी थेट भाष्य कोणीच करत नसल्याचे चित्र आहे. 
2014 विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तारू फुटले आणि मिरा भाईंदरमध्ये जवळपास दोन दशके राज्य करणाऱ्या या पक्षाला घरघर लागली. राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोसा यांनी शिवसेनेतून उमेदवारी मिळविली; मात्र भाजपचे नरेंद्र मेहता यांनी त्यांचा पराभव केला. त्या वेळी मेंडोसा यांच्या इतर सहकाऱ्यांनी भाजपचा हात हाती घेतला होता; परंतु आता पुलाखालून बरेच पाणी गेले असून राज्यात सत्तापरिवर्तन झाले असून राष्ट्रवादीमधून उडून गेलेले पक्षी पुन्हा घरट्याकडे येण्याची तयारी करत आहेत. यामध्ये गिल्बर्ट मेंडोसा यांचे एकेकाळचे उजवे हात समजले जाणारे ऍड. रवी व्यास आणि सहकारी पुन्हा एकदा मेंडोसाकडे परत येत असल्याने ते शिवसेनेत जाणार की येणारी महापालिका निवडणूक वेगळा गट बनवून लढविणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे. 

 

आम्ही जितेंद्र आव्हाड साहेबांची भेट ही आगरी भवनासाठी घेतली होती. या वेळी आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. 
- जयंत पाटील,
माजी अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस

Signs of political change in Bhayander Incoming from BJP to NCP will increase 

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signs of political change in Bhayander Incoming from BJP to NCP will increase