ठाणे ग्रामीण भागात सर्वत्र शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह संपूर्ण ग्रामीण भागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण पूर्व

कल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी रविवारी (ता. 22) सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता संचारबंदी करावी, असे नागरिकांना आवाहन केले होते, त्याला ठाणेसह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, शहापूर, बदलापूर अशा संपूर्ण ग्रामीण भागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दररोज होणारी वाहतूक कोंडी रविवारी मात्र दिसली नाही. दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांनीही संचारबंदीत सहभाग घेतल्याने नागरिकांना दुधाविना चहा आणि वृत्तपत्राशिवाय दिवस घालवावा लागला. तिसगाव नाका, पूना लिंक रोड, सिद्धार्थनगर, कोळसेवाडी, खडगोळवली, विजयनगरसह कल्याण पूर्वमध्ये शांतता पसरली होती. 
जुना पत्रीपूल पाडून नवीन पत्रीपुलाचे काम रखडल्याने त्या परिसरात वाहनांची रांग लागते; मात्र रविवारी वाहनांची वर्दळ नसल्याने मोकळा श्वास घेतला.

दहावीचा शेवटचा पेपर ढकलला पुढे, आता परीक्षा होणार 'या' तारखेनंतर

कर्फ्यू काळात स्वच्छता मोहीम 
रविवारी नागरिक घराबाहेर पडणार नसल्याने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाप्रमाणे पालिका हद्दीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कल्याण पूर्वमध्ये पालिकेचे आरोग्य निरीक्षक एल. के. पाटील यांच्या पथकाने कल्याण पूर्व पिंजून काढून ममता हॉस्पिटल, कैलासनगर, नेहरूनगर सिटी गार्डन, चिकणी पाडा, नंदा दीप, पूना लिंक रोड आदी परिसर साफ करत जंतूनाशक आणि धूर फवारणी केली.

कळवा, मुंब्य्रात संपूर्ण बंद 
कळवा : कळवा व मुंब्रा परिसरातील नागरिकांनी रविवारी कडकडीत बंद पाळून घरात राहण्याला पसंती दिल्याने परिसरातील रस्ते निर्मनुष्य दिसत होते. मुंब्रा, कळवा रेल्वेस्थानक, दोन्ही ठिकाणच्या बाजारपेठा, ठाणे-बेलापूर रस्ता अशा अनेक ठिकाणी वाहनांची वर्दळ पूर्णपणे बंद होती. या परिसरात कळवा पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. पोलिसांच्या वतीने नागरिकांचे ओळखपत्र तपासले जात होते. कळवा येथील मंदार केणी यांच्या आदर्श सामाजिक संस्थेच्या वतीने व कळवा शिवसेना शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन देण्यात आले. 

थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास

शहापुरात कडकडीत बंद 
शहापूर : शहापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतही रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील तसेच आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत घरात थांबून या कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदविला. त्यामुळे दररोज माणसांच्या गर्दीने गजबजून जाणारी शहापूरची मुख्य बाजारपेठ आणि गल्लीबोळातल्या उपबाजारपेठात शुकशुकाट होता. शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता. तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेच्या तालुक्‍यातील वासिंद, आसनगाव, आटगाव, तानशेत, खर्डी, उंबरमाळी आणि कसारा या रेल्वेस्थानकांवर पोलिस पथकांच्या सोबतीने कोतवाल, कारकून, तलाठी, मंडल निरीक्षक या महसूल कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. शहापूर एस.टी. आगारदेखील प्रवाशांअभावी निर्मनुष्य बनले होते.

अंबरनाथमध्ये शुकशुकाट 
अंबरनाथ : कर्फ्यूला अंबरनाथमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. कडकडीत बंदमुळे शहरातील सर्व व्यवहार सकाळपासूनच बंद होते. बंदच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या विविध क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शहरातील एका खासगी वाहिनीच्या वतीने दुपारचे जेवण त्यांच्या कामाच्या ठिकाणी नेऊन पुरवण्यात आले. दूध आणि औषध दुकाने वगळता शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. रेल्वेस्थानकातदेखील कमालीची शांतता होती. स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची चौकशी करण्यात येत होती. स्थानकाबाहेरच कोरोना दक्षता पथकाचे कर्मचारी तैनात होते. प्रवास करून आलेल्या प्रवाशांची त्यांच्यामार्फत चौकशी केली जात होती. 

WhatsApp वर मिळवा COVID19 ची अधिकृत माहिती, सुरु झालाय चॅटबॉक्स..

कल्याण-कर्जत राज्य महामार्ग निर्जन
बदलापूर : कोरोनाशी लढा देण्यासाठी पुकारलेल्या संचारबंदीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नेहमी रहदारीने गजबजलेला बदलापूर-अंबरनाथ आणि कल्याण-कर्जत राज्य महामार्ग हे दोन्ही पहाटेपासून शांत होते. पोलिस आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी सर्वत्र तैनात होते. या बंदमुळे बदलापुरातील निसर्ग संपन्नता आज नागरिकांना अनुभवता आली. पहाटेपासून सुरू असलेली पक्ष्यांचे मुक्त संचार आणि त्यांचा किलबिलाट आज स्पष्ट ऐकावयास मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान पालिकेतर्फे सार्वजनिक ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. 

वज्रेश्‍वरीसह ग्रामीण भागही निर्मनुष्य 
वज्रेश्वरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वज्रेश्‍वरीतील मानवी संचारबंदीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शंभर टक्के बंद पाळला. त्यामुले रस्ते, गल्ल्या, शिवाजी महाराज चौक निर्मनुष्य झाले. रस्त्यावर पोलिस प्रशासन, आरोग्य प्रशासन अधिकारी व स्वच्छता कामगारांव्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडले नाही. दरम्यान अंबाडी शिरसाड, भिवंडी वाडा महामार्गावर आज पहाटेपासून शुकशुकाट होता. 

रक्षकच बनताय कोरोनाचे भक्षक

किन्हवलीकरांचा प्रतिसाद 
किन्हवली : जनता कर्फ्यूला किन्हवली, शेणवा, डोळखांब, टाकीपठार, शेंद्रूण आदी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सकाळी सात वाजेपासून रस्त्यांवरील वाहतूक बंद असल्याने किन्हवलीतील रस्ते निर्मनुष्य दिसत होते. किन्हवली पोलिसांनी याबाबत चोख बंदोबस्त तैनात केला होता. किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पवार व कर्मचारी योगेश धानके, शंकर बांगर यांनी किन्हवली व परिसरात बाहेर गावाहून आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करून त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या.

वांगणीतही शुकशुकाट 
बदलापूर : कोरोनाशी लढा देण्यासाठी पुकारलेल्या संचार बंदीला वांगणीतील नागरिकांनी प्रतिसाद दिला. रेल्वेस्थानकासह कल्याण-कर्जत महामार्ग असो, की गल्लीबोळातील रस्ता असो, सर्वत्र शुकशुकाट होता. पोलिस आणि ग्रामपंचायतीमधील अधिकारी आणि कर्मचारी ठिकठिकाणी तैनात दिसत होते. नेहमी रहदारीने गजबजलेली वांगणीतील बाजारपेठ व रेल्वेस्थानकावरील सर्व परिसर पहाटेपासून ओस पडला होता. कर्जत-महामार्ग असो, वांगणी व आसपासच्या गाव-पाड्यातील गल्लीबोळात शुकशुकाट होता. वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात व रेल्वेस्थानक येथे प्रवाशांची तपासणी करण्याकरिता दोन आरोग्य पथक तैनात केले होते. 
Silence everywhere in the rural areas of Thane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silence everywhere in the rural areas of Thane