शांतता... परीक्षा सुरू आहे!

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

पनवेलमधील बारावीचे १० हजार विद्यार्थी लिहिणार पेपर; केंद्रांवर बंदोबस्त

नवीन पनवेल : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बारावीच्या परीक्षेला आज (ता.१८) पासून सुरुवात होत आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात दहावी किंवा बारावीच्या वर्गात शिकणारी मुले आहेत, त्यांच्या घरात कमालीची शांतता पसरली आहे. मुलांना अभ्यास करताना कसलाच त्रास नको म्हणून आई-वडील प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत. घरातील टीव्हीदेखील बंद करण्यात आला आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी मागे पडू नये, याकरिता आपल्याच नाही, तर शेजारील घरातदेखील शांतता राखण्याची विनंती पालकांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा ः उद्धव ठाकरेंच्या ‘या’निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज 

पनवेलमध्ये ११ केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेला १० हजार ६०८ विद्यार्थी बसणार आहेत.  या परीक्षेत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस खात्याचीही मदत घेतली जाणार आहे. यंदा पनवेल शहरासह तालुक्‍यात एकूण ११ केंद्रे तसेच दोन पर्यवेक्षण केंद्रांमधून १० हजार ६०८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सुधागड पर्यवेक्षक केंद्रात ४ हजार ३०३ व व्ही. के. हायस्कूल केंद्रात ६ हजार ३०५ अशी दोन पर्यवेक्षक केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये सुधागड हायस्कूल केंद्रांमधून सर्वाधिक एक हजार ६८८ जास्त; तर बान्स हायस्कूल केंद्रावर सर्वात कमी ३६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सोमवारी प्रत्येक केंद्रावर बैठक क्रमांक जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली होती.

हे पण वाचा ः पोल्‍ट्री व्यवसाय संकटात 

या केंद्रावर होणार परीक्षा
आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय कामोठे, सुधागड हायस्कूल, महात्मा फुले विद्यालय, कळंबोली, पी. जे. म्हात्रे विद्यालय- खारघर, व्ही. के. हायस्कूल पनवेल, बान्स स्कूल, सीकेटी विद्यालय, व्ही. के. लोधिवली व मोहपाडा या ठिकाणी बारावीची परीक्षा होणार आहे. 

पोलिस सज्‍ज 
विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचता यावे, यासाठी पनवेल वाहतूक विभाग परीक्षा केंद्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिस तैनात करणार आहे. याबाबत विभागीय वाहतूक खात्याचे सहायक पोलिस आयुक्त रवींद्र चव्हाण यांनी  वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभिजित मोहिते, कळंबोलीचे अंकुश खेडकर, तळोजाचे राजेंद्र आव्हाड, खारघरचे आनंद चव्हाण, नवीन पनवेलचे मधुकर भटे यांना सूचना दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silence ... the exam is on!