
पश्चिम रेल्वे, आयआरसीटीसी, एमआरव्हीसी यांच्याकडून सर्रास मराठी भाषेला डावलले जात आहे.
मुंबई: पश्चिम रेल्वेप्रमाणेच इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)कडून मराठी भाषेला डावलले जात आहे. समाज माध्यमावरून, प्रसिद्धी पत्रकातून इंग्रजी आणि हिंदीचा वापर केला जातो. त्यामुळे त्रिभाषा सूत्री नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वारंवार तक्रारी, रेल्वे अधिकाऱ्यांना भेटून मागणी करण्यात आली आहे. मात्र आता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी भूमिका मराठी भाषिकांकडून करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे, आयआरसीटीसी, एमआरव्हीसी यांच्याकडून सर्रास मराठी भाषेला डावलले जात आहे. अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात येणारी माहिती इंग्रजी, हिंदी भाषेत दिली जाते. मुंबई कार्यालय असून देखील मराठी भाषेची गळचेपी रेल्वे अधिकाऱ्यांकडून केली जाते. याची चीड मराठी भाषिकांना येत आहे.
हेही वाचा- Corona Updates:अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही घरात 7 दिवस क्वारंटाईन बंधनकारक
2018 साली अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे सुरक्षा आयोगाने प्रवाशांना सूचना आणि हरकती नोंदविण्याचे आवाहन केले होते. यावेळी सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राध्यापक अवकाश जाधव यांनी मराठीतून सूचना देण्यास सुरुवात केली. मात्र रेल्वे प्रशासनाला मुंबईकरांच्या मराठी भाषेतील उपाययोजना आक्षेपार्ह वाटल्या, त्यांनी जाधव यांना हिंदी किंवा इंग्रजीत बोलण्यास सांगितले होते. मात्र जाधव यांनी अनुवादकाला बोलवा. मी मराठीत माहिती देतो, असे सांगितले.
दरम्यान, 2020 मध्येही मराठी भाषेसाठी मुंबईत झगडावे लागत आहे. आता तरी बदल होणे अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राध्यापक अवकाश जाधव यांनी दिली.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मध्य रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी सांगितले की, मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांच्यावतीने पश्चिम रेल्वे प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे संघटनेच्यावतीने पाठपुरावा सुरू आहे.
पश्चिम रेल्वेनंतर आता आयआरसीटीसी, एमआरव्हीसी यांना निवेदन देऊन येणार आहोत. जर त्यानंतरही मराठी भाषेचा वापर केला नाही, तर मनसे शैलीने खळखट्यात केला जाईल.
जितेंद्र पाटील, अध्यक्ष, नवनिर्माण रेल्वे कामगार सेना
मराठी एकीकरण समितीच्यावतीने त्रिभाषासूत्री नियमांचे पालन करण्यासाठी 2017 रोजी पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी मागणी मान्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही पश्चिम रेल्वेने त्यांचे आश्वासन पूर्ण केले नाही. मागील तीन वर्ष तक्रारी करून पाठपुरावा करत आहोत. रेल्वे संबंधित ज्या गोष्टी निगडित आहेत. त्या महाराष्ट्रात मराठीत असणे आवश्यक आहेत. राज्य शासनाने यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे. मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्यांना रेल्वेसाठी नेमले पाहिजेत. या अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाची कान उघडणी केली पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाईचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला पाहिजे. राज्यातील सरकार कोणतेही असो, मराठी भाषेसाठी ताठ कणाने उभे राहत नाहीत.
गोवर्धन देशमुख, अध्यक्ष, मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य
---------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Similar Western Railway IRCTC MRVC not using Marathi language