esakal | भावगीत गायक विनायक जोशी कालवश 
sakal

बोलून बातमी शोधा

भावगीत गायक विनायक जोशी कालवश 

बाबुल मोरा, चित्रगंगा, गीत नवे गाईन मी, सरींवर सरी, तीन बेगम एक बादशहा यांसारख्या अनेक सांगीतिक कार्यक्रमांचे संकल्पक, ज्येष्ठ भावगीत गायक व "चतुरंग प्रतिष्ठान'चे कार्यकर्ते विनायक जोशी (वय 59) यांचे शनिवारी (ता.15) मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले.

भावगीत गायक विनायक जोशी कालवश 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : बाबुल मोरा, चित्रगंगा, गीत नवे गाईन मी, सरींवर सरी, तीन बेगम एक बादशहा यांसारख्या अनेक सांगीतिक कार्यक्रमांचे संकल्पक, ज्येष्ठ भावगीत गायक व "चतुरंग प्रतिष्ठान'चे कार्यकर्ते विनायक जोशी (वय 59) यांचे शनिवारी (ता.15) मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. इंदोर येथून गीतांचा कार्यक्रम करून परतत असताना त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवारी सायंकाळी डोंबिवली येथील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार असून त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी पूर्णिमा, मुलगा गंधार आणि सून गेयश्री असा परिवार आहे. 


विनायक जोशी यांचा जन्म 11 मे 1961 ला झाला. पं. एस. के. अभ्यंकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीतातील प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. पं. विजयसिंह चौहान यांचे गझल गायनासाठी विशेष मार्गदर्शन त्यांना लाभले. शनिवारी इंदोर येथे श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भावगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विनायक जोशी यांनी गायन केले. कार्यक्रम संपून ते डोंबिवली येथील घरी परतत असतानाच धुळ्याजवळ त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि बसमध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

ही बातमी वाचा ः शिलाहार राजवटीच्या पाऊलखुना पुसट

विनायक जोशी यांना कार्यक्रमाप्रसंगीच त्रास जाणवू लागला होता, परंतु त्यांनी तसाच कार्यक्रम पूर्ण केला, असे "चतुरंग'च्या कार्यकर्त्यांनी सांगितले. बॅंक ऑफ इंडियात नोकरी करणारे विनायक जोशी काही महिन्यांतच निवृत्त होणार होते. नोकरी करतानाच त्यांनी आपल्यातील गायकीच्या कलेचीही उत्तम जोपासना केली होती. "चतुरंग प्रतिष्ठान'चे कार्यकर्ते, स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीचे विश्‍वस्त म्हणून काम पाहात होते. 


देश-विदेशात गायनाचे कार्यक्रम 
वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई यांच्या गाण्यांवर बेतलेला "वसंत बहार', गझलकार संदीप गुप्ते यांच्या गझलांवर आधारलेला "जरा सी प्यास', खगोल अभ्यासक हेमंत मोने यांच्या माहितीपूर्ण निवेदनासह साकारलेला "सूर नभांगणाचे', स्वरतीर्थसाठी आयोजित केलेले "भाभी की चूडियॉं', वसंत आजगावकर-मधुकर जोशी यांच्या गीतांना 50 वर्षे झाल्याच्या निमित्ताने बेतलेला "करात माझ्या वाजे कंकण' हा व असे अनेक कल्पक कार्यक्रम विनायक यांनी सादर केले आहेत. तसेच अमेरिकेतील न्यू जर्सी व रिचमंड येथे सोलो कार्यक्रम, दिल्ली-जालंधर जम्मू येथे सैगल गीतांवरचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. त्यांना 2019 साली आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 
 

loading image