जरा...माहिती घेऊन जा रे; पुढे वाहतूक कोंडी आहे!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

शीव-पनवेल महामार्गावरील नेरूळ व उरण फाटा उड्डाणपुलावरील मार्गांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी खड्डे दुरुस्ती करण्यात येत असल्याने मुंबईकडून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावरील नेरूळ व उरण फाटा उड्डाणपुलावरील मार्गांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी खड्डे दुरुस्ती करण्यात येत असल्याने मुंबईकडून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, उरण फाटा परिसरात करण्यासाठी 5 मिनिटांच्या प्रवाशांना 15 ते 20 मिनिटांहून अधिक वेळ खर्ची घालावा लागत आहे. यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे; तर नियमित प्रवास करणाऱ्यांकडून या मार्गाऐवजी पामबीचमार्गे पुन्हा शीव पनवेल महामार्ग गाठला जात आहे. 

ही बातमी वाचली का? भारतात एप्रिलमध्य़े मर्सिडीजची इलेक्ट्रीक मोटार!

सायन-पनवेल महामार्गावरून दररोज हजारो वाहने व पाच लाखांपेक्षा अधिक प्रवासी ये-जा करतात. पावसामुळे खराब झालेल्या सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. वाशी ते कामोठेपर्यंतचे उड्डाणपुलाचे कॉंक्रिटीकरण याधीच करून पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलांवरील मार्गिका डांबर टाकून बनवण्यात आल्याने, या मार्गांवर सतत खड्डे पडत आहेत. त्यामुळे नेरूळ व उरण फाटा उड्डाणपुलाचे सिमेंटीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले असून, या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक विभागाने सकाळी 2 तास व सायंकाळी 3 तासांचा अवधी हा स्थानिक व लहान वाहनांसाठी राखीव ठेवला असून, या काळात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही उरण फाटा, एमआयडीसी भागातून शीव- पनवेल महामार्गावर येण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने अवजड व लहान वाहने याच मार्गावरून येत आहेत; तर उड्डाणपूल बंद असल्याने त्याच्या शेजारून पनवेल व उरणकडे जाणारी लहान वाहने मुंबई व ठाण्यातून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यात उड्डाण पुलांखालील उरण फाटा भागात एनएमएमटीचा बस थांबा असल्याने अनेक बस या निमुळत्या मार्गावर थांबत असून, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे त्रासलेल्या वाहनचालकांकडून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

ही बातमी वाचली का? एसी डबल-डेकरमध्ये यामुळे होतीये प्रवाशांची गैरसोय!

नेरूळ उड्डाणपुलावरील सिमेंटीकरणाचे काम साधारण एक महिना सुरू राहण्याची शक्‍यता आहे. सकाळी 9 ते 11 व सायंकाळी 5 ते 8 या कालावधीत अवजड वाहनांना पुलाच्या खालून जाणे बंद करण्यात आले आहे. ही वाहतूक महापे, शीळ फाटा मार्गे कलंबोलीत सोडण्यात येत आहेत. या दोन टप्प्यांत स्थानिक व लहान वाहनांना या मार्गावरून प्रवेश देण्यात येत आहे. गव्हाण फाटा, न्हावा-शेवावरून येणाऱ्या वाहनांनादेखील कळंबोलीमार्गे वळवण्यात आले आहे. 
- सुनील लोखंडे, उपायुक्त वाहतूक विभाग, नवी मुंबई. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on sion panvel highway Nerul, Uran Fata flyover closed!