
भावाने मोबाईल पाहू नको सांगितल्याने बहिणीची आत्महत्या
डोंबिवली - मोबाईल जास्त वेळ पाहू नको असे भावाने सांगितल्याचा राहू आल्याने 18 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. किरण सहानी असे मयत मुलीचे नाव असून मुलीचा भाऊ विक्रम सहानी (वय 22) याने दिलेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरात त्रिमूर्ती नगर मध्ये सहानी कुटुंब रहाण्यास आहे. घरातील मंडळी ही यूपी येथील त्यांच्या गावी गेली असून घरात विक्रम व किरण ही दोघेच भावंड सध्या होती.
विक्रम हा घरूनच काम करीत होता. बुधवारी दुपारी त्याने बहीण किरणला मोबाईल जास्त वेळ पाहू नको असे सांगत मोबाईल मधील सिमकार्ड काढून ठेवले. त्यानंतर किरण ही पाणी भरत होती, पाणी भरून वाहू लागल्याने किरण कोठे आहे हे पाहण्यासाठी विक्रम गेला असता एका खोलीत किरणने गळफास लावून घेतल्याचे त्याला आढळून आले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने किरण ला खाली उतरवीत शास्त्रीनगर रुग्णालयात हलविले असता कर्तव्यावरील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात विक्रम याच्या सांगण्यावरून घटनेची नोंद करण्यात आली आहे.