धूम्रपानामुळे घुसमटतेय ‘तरुण’ हृदय!

नेत्वा धुरी
मंगळवार, 15 जानेवारी 2019

डॉक्‍टरांचे निष्कर्ष 
 धूम्रपान करणाऱ्या तरुणांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांत वाढ
 कामाच्या अनिश्‍चित वेळा, स्पर्धा यामुळे तरुणांवर वाढता ताण
 जेवणाची अनिश्‍चित वेळ, खाण्याची चुकीची पद्धत यामुळे फटका

मुंबई - धूम्रपान म्हणजे तरुणांसाठी जणू ‘स्टाईल स्टेटमेंट’ झाले आहे; मात्र याच्या नादात तरुणांचे हृदय कमजोर होत आहे. केईएम रुग्णालयात दर दोन-तीन महिन्यांनी एखादा तरुण हृदयाशी संबंधित आजाराच्या उपचारासाठी दाखल होत आहे. यातील बहुतांश जण धूम्रपान करत असल्याचे आढळले आहे. 

ठाण्यात १६ वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला होता. गेल्या पाच वर्षांत तारुण्यातच हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्‍टर सांगतात. मुंबईतील २८ वर्षांची तरुणी सध्या केईएमच्या कार्डिओलॉजी विभागात उपचार घेत आहे. या मुलीला वर्षभरात दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी सांगितले. दर दोन-तीन महिन्यांतून किमान एखादा २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुण हृदयविकाराच्या झटक्‍यामुळे रुग्णालयात दाखल होत आहे. काही महिन्यांपूर्वी कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणाला कार्यालयातच हृदयविकाराचा झटका आला होता. 

सुदैवाने तो बचावला. या तरुणाचे कामाचे तास निश्‍चित नव्हते. अतिताण हे हृदयविकाराचे कारण होतेच; पण केईएम रुग्णालयात हृदयविकारावर उपचारासाठी आलेल्या बहुतांश तरुणांना धूम्रपानाचे व्यसन असल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे तारुण्यात हृदयविकाराचा झटका येण्यासाठी धूम्रपान हे कारण असण्याची शक्‍यता कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी १६ वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला होता. तिच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात यशस्वी उपचार झाले; मात्र तरुणांनी हृदयाची काळजी घ्यावी, असे आवाहन ज्युपिटर रुग्णालयाचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. विजय सुरासे यांनी केले. 

डॉक्‍टरांचे निष्कर्ष 
 धूम्रपान करणाऱ्या तरुणांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांत वाढ
 कामाच्या अनिश्‍चित वेळा, स्पर्धा यामुळे तरुणांवर वाढता ताण
 जेवणाची अनिश्‍चित वेळ, खाण्याची चुकीची पद्धत यामुळे फटका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smoking means as a style statement for the youth