ओलाव्याच्या शोधात साप घरात

ओलाव्याच्या शोधात साप घरात

मुंबई - मेट्रो मार्गाबरोबरच मुंबईमध्ये सुरू असलेल्या वाढत्या बांधकामाच्या त्रासाने मुंबईकर हैराण झालेला असतानाच सतत हादरे बसत असल्याने जमिनीखाली राहणारे सरपटणारे प्राणीही बिथरले आहेत. त्यातच कडाक्‍याच्या उन्हामुळे जमिनीत पाणीसाठाही आटत असल्याने ओलाव्याच्या शोधात नाग, साप आणि अजगरासारखे प्राणी जमिनीबाहेर येऊ लागले असल्याचे निरीक्षण सर्पमित्र नोंदवत आहेत. 

काही दिवसांत सरपटणारे प्राणी तळमजल्यावरील घरांच्या बाथरूममध्ये सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्याच्या ओलाव्यासाठी ते तिथे येत असल्याचा अंदाज निसर्गतज्ज्ञ आणि ‘सर्प’ प्राणिप्रेमी संस्थेचे सर्पमित्र चैतन्य कीर यांनी वर्तवला आहे.

गेल्या आठवड्यात कांदिवलीतील नामांकित बॅंकेतील बाथरूममध्ये डुरक्‍या घोणस आढळला. त्याआधी रेसकिंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर (रॉ) प्राणिप्रेमी संस्थेला एक अजगर बाथरूममध्ये सापडला होता. दोन दिवसांपूर्वीच ‘सर्प’ संस्थेला पुन्हा बाथरूममध्येच साप आढळला. जमिनीतील ओलावा संपण्यामागे वाढत्या कंपनाने संपणारे पाणी कारणीभूत असल्याची माहिती कीर यांनी केली. मुख्यत्वे मेट्रोची कामे सुरू असलेल्या भागांत असा प्रकार पाहायला मिळत आहे. सर्पमित्र संघटनांनी गेल्या काही दिवसांत ४० ते ६० सापांना विविध ठिकाणांहून पकडून जंगलात सोडून दिले.

प्रामुख्याने साप आढळणारी ठिकाणे 
 मालाड ते मिरा रोड
 अंधेरी पश्‍चिमेकडील भाग (परिसरात नव्या इमारतींचे बांधकाम आणि मेट्रोची कामे सुरू आहेत)
 वांद्रे-कुर्ला संकुल 
(मेट्रोची कामे जोमाने सुरू आहेत) 

आढळणारे साप 
नाणेकी - जंगल परिसरानजीक आढणारा नाणेकी साप आधी केवळ पावसाळा आणि हिवाळ्यातच दिसायचा. पाणवनस्पतींच्या जागेत त्याचा अधिवास असतो. काही वर्षांपासून तो नाले वा गटारांतही दिसून येतो. 
अजगर - आरे जंगल परिसरात आधी अजगरांचा अधिवास होता. आता वांद्रे-कुर्ला संकुलात ते सर्रास दिसून येतात.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com