...म्हणून होते अपंगांची फरफड

...म्हणून होते अपंगांची फरफड

अलिबाग : अपंग व्यक्तींना कागदी ओळखपत्राऐवजी स्मार्ट कार्ड मिळावे, यासाठी राज्य सरकारने 2018 पासून ऑनलाईन पद्धत सुरू केली; परंतु ओळखपत्र व दाखले देण्याची ऑनलाईन प्रक्रिया अपंगांसाठी डोकेदुखी बनली आहे. नोंदणी झालेल्या 6 हजार 835 अपंगांपैकी फक्त 2 हजार 420 जणांना दाखले व स्मार्ट कार्ड मिळाले असून, 4 हजार 415 जण ओळखपत्राच्या प्रतीक्षेतच आहेत. अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉक्‍टर, संगणकीय कर्मचाऱ्यांची कमतरता व इंटरनेटचा अभाव आदी समस्यांमुळे अपंगांना दाखले व स्मार्ट कार्ड मिळण्यात विलंब होत असल्याचे समोर आले आहे. 

रायगड जिल्हा रुग्णालयाकडून डॉक्‍टरांच्या सहीने अपंगत्वाचा दाखला मिळाल्यावर जिल्हा परिषदेच्या अपंग विभागाकडून ओळखपत्र दिले जात होते. हे कागदी ओळखपत्र सांभाळून ठेवणे कठीण असल्यामुळे अपंगांना स्मार्टकार्ड व दाखले ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी 2018 पासून सुरू आली. सरकारने नमूद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून जिल्हा रुग्णालयात पावती दाखवावी लागते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात आधार कार्ड, शिधापत्रिका व छायाचित्रांच्या दोन प्रती सादर कराव्या लागतात. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यावर आठ दिवस ते महिनाभरात अपंगत्वाचा दाखला मिळतो. त्याचप्रमाणे स्मार्ट कार्ड ओळखपत्र दोन महिन्यांत घरपोच मिळते. 

अपंगाची दाखल्यांसाठी होणारी पायपीट थांबावी आणि त्यांना अद्ययावत पद्धतीने दाखले व ओळखपत्र मिळावे यासाठी सरकारने ऑनलाईन प्रक्रिया आणली. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ऑनलाईन दाखले व ओळखपत्रासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला. दर बुधवारी या कक्षात अपंग अर्जदाराची तपासणी करून संगणकावर नोंद होते. त्यानंतर आठवडा अथवा महिनाभरात दाखला आणि दोन महिन्यांत स्मार्ट कार्ड ओळखपत्र मिळणे अपेक्षित असते. 

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अपंग दाखले वितरण कक्षातील संगणकांची कमतरता, डेटा एंट्री ऑपरेटर आणि इंटरनेटचा अभाव अशा अनेक समस्यांमुळे या प्रक्रियेत विलंब होत आहे. या कामाचा भार फक्त दोन कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे कामाचे नियोजन करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही दिली जाते; परंतु प्रत्यक्षात मात्र अपंगांना दाखले मिळवण्यासाठी वणवण करावी लागते. या विसंगतीबद्दल अपंगांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. 

अपंगांना दाखले मिळावेत, यासाठी रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्‍यात समाजकल्याण विभागामार्फत शिबिरे घेण्यात आली. ऑनलाईन नोंदी करण्यात आल्या; मात्र अद्याप अपंगांना दाखले मिळालेले नाहीत. ही कामे एका क्‍लिकवर होणे अपेक्षित असूनही, अपंगांना दाखले आणि स्मार्ट कार्डसाठी वणवण करावी लागत आहे. 
- साईनाथ पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अपंग संघटना 

अपंगांना ऑनलाईन दाखले व स्मार्ट कार्ड देण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. सरकारने यापूर्वी सुरू केलेले संकेतस्थळ बंद झाल्यामुळे दुसऱ्या संकेतस्थळावरून दाखल्यांची नोंदी होत आहेत. त्याचे काम सुरू असून, संबंधितांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व अपंगांना लवकरच दाखले व स्मार्ट कार्ड मिळतील. 
- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग 

दृष्टिक्षेपात 

जिल्ह्यातील अपंग व्यक्ती : 17,854 
नोंदणीकृत : 6,835 
दाखले, स्मार्ट कार्डधारक : 2,420 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com