मुंबईतील ‘या’ महाविद्यालयाने घेतला सुमारे 40 तुकड्या बंद करण्याचा निर्णय

तेजस वाघमारे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

राज्य सरकारच्या स्वायत्तता धोरणानुसार सोमय्या विद्याविहार विद्यापीठ हे विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार सोमय्या एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत येणारी सर्व महाविद्यालये या विद्यापीठाच्या अंतर्गत येणार आहेत. या महाविद्यालयांतील स्वयंअर्थसाह्यित अभ्यासक्रम खाजगी विद्यापीठाअंतर्गत सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. मात्र हे करण्यापूर्वी संस्थेने सध्या सुरू असलेले हे अभ्यासक्रम बंद करण्याची परवानगी संस्थेने मुंबई विद्यापीठाकडून घेतलेली नाही.

मुंबई : विद्याविहार येथील तीन सोमय्या महाविद्यालयाने बीएमएम, बॅफ, बीएसस्सी यासारख्या अभ्यासक्रमांच्या सुमारे 40 तुकड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या दीड हजार जागांना बसणार असून हे सर्व अभ्यासक्रम सोमय्या विद्याविहार या खाजगी विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहेत. मात्र हे अभ्यासक्रम बंद करण्यासाठी संस्थेला मुंबई विद्यापीठाने अद्याप परवानगी दिलेली नाही. 

राज्य सरकारच्या स्वायत्तता धोरणानुसार सोमय्या विद्याविहार विद्यापीठ हे विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार सोमय्या एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत येणारी सर्व महाविद्यालये या विद्यापीठाच्या अंतर्गत येणार आहेत. या महाविद्यालयांतील स्वयंअर्थसाह्यित अभ्यासक्रम खाजगी विद्यापीठाअंतर्गत सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. मात्र हे करण्यापूर्वी संस्थेने सध्या सुरू असलेले हे अभ्यासक्रम बंद करण्याची परवानगी संस्थेने मुंबई विद्यापीठाकडून घेतलेली नाही. याशिवाय नऊ विविध विषयांतील बीएस्सी पदवीचे शिक्षण, वाणिज्यच्या सुमारे 1800 जागा, आर्ट्सच्या 11 विषयांतील शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या महाविद्यालयात या सर्व स्वयंअर्थसाह्यित तुकड्या होत्या. या तुकड्या बंद करून त्या खाजगी विद्यापीठाअंतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेताना कोणतीही प्रक्रिया पार पाडलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, असा आरोप मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी केला आहे. या अल्पसंख्याक संस्थेत गुजराती समाजातील तसेच आसपासच्या परिसरातील अनेक अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना खाजगी विद्यापीठाचे पाच पट शुल्क परवडणारे नसून हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीतीही गांगुर्डे यांनी व्यक्त केली. याबाबत विद्यापीठाने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी कुलसचिवांना पत्राद्वारे केली आहे. 

सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचे प्रोव्होस्ट प्रा. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई म्हणाले, मुंबई विद्यापीठाशी संलग्नित तीन महाविद्यालयांमध्ये सोमय्या विद्याविहार विद्यापीठ कोणताही अभ्यासक्रम राबविणार नाही. सोमय्या विद्याविहार विद्यापीठ या खाजगी विद्यापीठ स्थापना 2019 मध्ये राज्याच्या विधिमंडळात करण्यात आली. या विद्यापीठाअंतर्गत मॅनेजमेंट, इंजिनीअरिंग, आर्ट्स, कॉमर्स, कम्प्युटर सायन्स असे विविध अभ्यासक्रम स्वयंअर्थसाह्यित तत्वावर शिकविले जाणार आहेत. विविध शाखांतील स्वयंअर्थसह्यित अभ्यासक्रम बंद करण्याबाबत आम्ही मुंबई विद्यापीठाकडे अर्ज केला आहे. याबाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जाणार आहे. 

संपादन- सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Somaiya College in Mumbai has decided to close the syallabus