esakal | ठाण्यात खरेदीच्या उत्साहामुळे कोंडी! 
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात खरेदीच्या उत्साहामुळे कोंडी! 

सजावटीच्या साहित्यापासून प्रसादाच्या मिठाईपर्यंत आणि गणरायाच्या अलंकारापासून रोषणाईच्या दिव्यांपर्यंतच्या खरेदीसाठी सकाळपासूनच ठाणेकरांनी बाजारात धाव घेतली होती.

ठाण्यात खरेदीच्या उत्साहामुळे कोंडी! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : गणेशोत्सवाच्या तयारीसाठी रविवारी ठाण्याच्या बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून आले. सजावटीच्या साहित्यापासून प्रसादाच्या मिठाईपर्यंत आणि गणरायाच्या अलंकारापासून रोषणाईच्या दिव्यांपर्यंतच्या खरेदीसाठी सकाळपासूनच ठाणेकरांनी बाजारात धाव घेतल्याने जांभळीनाका परिसरात दिवसभर कोंडी दिसून आली.

ग्राहकांच्या गर्दीतून वाट काढणाऱ्या वाहनांना रस्त्यावर पथारी पसरून बसलेले फेरीवाले आणि बेकायदा उभी करण्यात आलेली वाहने यांच्यामुळेही वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. सायंकाळनंतर तर या ठिकाणच्या कोंडीत आणखी भर पडली. 
शहरातील जुनी बाजारपेठ म्हणून जांभळीनाका परिसरात ग्राहकांचा ओढा असतो. या बाजारपेठेत एरव्हीही ग्राहकांची गर्दी होत असली तरी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी जांभळीनाका परिसरात पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांचे अक्षरश: लोंढे उसळतात.

गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच या बाजारपेठेत दुकानांबाहेर गर्दी दिसायला सुरुवात होते. गणपती आगमनासाठी बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. पूजा साहित्य, सजावट वस्तू विकणाऱ्या दुकानांबाहेर रांगा लावून ग्राहक खरेदी करत आहेत. या रांगा रस्त्यावर अक्षरश: लांबवर पसरल्याने वाहतुकीसाठी असलेला अर्धा रस्ता व्यापला जात आहे. या रस्त्यातूनच पर्यावरणपूरक मखराच्या जाहिराती करणारे मोठे फलक घेऊन विक्रेते सायकलींवर फिरत असल्याने, तसेच इतर वाहनांच्या तुलनेत सायकल धीम्या गतीने जात असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांच्या लांब रांगा या रस्त्यावर लागत असल्याचे चित्र होते. 

दुतर्फा पार्किंगचा त्रास 

बाजारपेठेत खरेदीला येणाऱ्या ग्राहकांची आणि दुकानदारांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. या भागात वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे ग्राहकांना येथे वाहने उभी केल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. या काळात येथे वाहतुकीचे किमान नियोजन करण्याची आवश्‍यकता असते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून तेही केले जात नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

loading image
go to top