दिल्लीपेक्षा मुंबईची हवा घातक; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला| Air Pollution | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीपेक्षा मुंबईची हवा घातक; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

दिल्लीपाठोपाठ मुंबईतील हवेनेसुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे.

दिल्लीपेक्षा मुंबईची हवा घातक; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई - दिल्लीच्या हवा प्रदुषाणाने लॉकडाऊनची वेळ आली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा चिंता व्यक्त केली आहे. आता दिल्लीपाठोपाठ मुंबईतील हवेनेसुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबईतील कुलाबा परिसरातील हवा दिल्लीपेक्षाही घातक असल्याचं समोर आलं आहे. सफर या हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या आणि नोंद करणाऱ्या प्रणालीने यासंदर्भात अहवाल दिला आहे. त्यानुसार, सोमवारी दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा ३३१ इतका होता. तर कुलाबा परिसरातील हाच निर्देशांक ३४५ इतका नोंद झाला आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मुंबईत रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसंच कारखानेसुद्धा सुरु झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सुधारणा झालेल्या हवेच्या गुणवत्तेत घसरण होत आहे. हवा प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच दिवाळीत फटक्यांची आतषबाजीसुद्धा याच्या वाढीसाठी कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईत हवेची गुणवत्ता ही १६४ एक्यूआय आणि दुसऱ्या दिवशी २२१ एक्यूआय अशी नोंदवली होती. वाढत्या प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावरसुद्धा घातक परिणाम होत आहे. त्यामुळे ज्यांना अस्थमा, खोकला किंवा श्वास घेण्यासाठी काही त्रास होत असेल तर त्यांनी तातडीने उपचार घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

प्रदुषित वातावरणामुळे वृद्ध आणि मुलांना धोका आहे. त्यांना या वातावरणाचा जास्त त्रास सहन करावा लागू शकतो असं सफर या निरीक्षण संस्थेनं म्हटलं आहे. सोमवारी पूर्ण मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा २४५ इतका नोंदवला गेला होता. हा निर्देशांक आरोग्यासाठी घातक आहे. अनेक भागात हवेची पातळी खालच्या पातळीवर पोहोचली आहे.

loading image
go to top