अडचण झाली दूर, डोंबिवली-ठाणे अवघ्या पंधरा मिनिटांत! 

सुचिता करमरकर
Tuesday, 11 August 2020

मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या माणकोली उड्डाण पुलाच्या कामाला जमीन अधिग्रहित करण्यात येत असलेल्या अडचणी दूर झाल्याने गती मिळाली आहे. येत्या पंधरा महिन्यांत हा पूल वाहतुकीस खुला होईल, अशी अपेक्षा आहे. डोंबिवली ते ठाणे हा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटांत व्हावा, या दृष्टीने मोठागाव ते माणकोली या 1,233 मीटर लांबीच्या पुलाचे काम प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी 223 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

कल्याण : मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या माणकोली उड्डाण पुलाच्या कामाला जमीन अधिग्रहित करण्यात येत असलेल्या अडचणी दूर झाल्याने गती मिळाली आहे. येत्या पंधरा महिन्यांत हा पूल वाहतुकीस खुला होईल, अशी अपेक्षा आहे. डोंबिवली ते ठाणे हा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटांत व्हावा, या दृष्टीने मोठागाव ते माणकोली या 1,233 मीटर लांबीच्या पुलाचे काम प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी 223 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

नक्की वाचा : लहरी पावसामुळे पारंपरिक भातशेतीला छेद; भिवंडीत प्रथमच भुईमुगाच्या शेतीचा प्रयोग

पुलाच्या माणकोली दिशेकडील जमीन अधिग्रहित करण्यास येत असलेल्या अडचणी दूर झाल्यामुळे पुलाचे काम वेगात सुरू होईल, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे, स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांसमवेत शिंदे यांनी आज या पुलाच्या कामाची पाहणी केली. 

115 मीटर लांबीच्या गर्डर तसेच पुलाचे खांब उभे करण्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या पंधरा महिन्यांच्या काळात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. डोंबिवली ते ठाणे हा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटांत व्हावा, या दृष्टीने मोठागाव ते माणकोली या 1,233 मीटर लांबीच्या पुलाचे काम प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आले आहे. 

'रिंगरोड टप्पा-3'लाही मुहूर्त 

  • कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंगरोड प्रकल्पातील टप्पा क्रमांक तीनचेही काम 15 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामाचे आराखडे 2013 मध्ये तयार करण्यात आले होते; मात्र त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे या कामाला सुरुवात झाली नव्हती. 
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेने तिसऱ्या टप्प्यातील या रस्त्यासाठी 67 टक्के जागा संपादित केली आहे. 6.8 किलोमीटर लांबीच्या या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 400 कोटी रुपये खर्चाच्या या तिसऱ्या टप्प्याच्या कामामुळे डोंबिवली शहरातील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. 
  • रिंग रोड प्रकल्पात दोन स्टिल्ट ब्रिज उभे करण्यात येणार आहेत. या कामातील आराखड्याची तांत्रिक पुनर्तपासणी करून नजीकच्या काळात निविदा प्रसिद्ध करण्यात येईल. या टप्प्यात दिवा-वसई रेल्वे मार्गावर एक भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. सीआरझेडच्या नियमांचे पालन करत स्टिल्ट ब्रिजही करण्यात येणार आहेत. 

क्लिक करा : शंकरराव गडाख यांनी बांधले शिवबंधन; मातोश्रीवर पार पडला शिवसेना पक्षप्रवेश

पुलांना आता "हेरिटेज' दर्जा द्या : मनसे 
कल्याण-डोंबिवली शहरातील विविध पुलांचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्री पूल आणि माणकोली पुलाला आता हेरिटेजचा दर्जा द्यावा, असा तिरकस टोला कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लगावला आहे. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी पूलकोंडी सोडवण्यास असमर्थ असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. 

---------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speed up the work of Mankoli flyover, land acquisition problem solved