एसटी अधिकारी तुपाशी, कर्मचारी उपाशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

दर महिन्यात 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते. मात्र, आज वेतन न झाल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांना वेतन, मात्र कामगारांना वेतन का नाही, असा प्रश्न उपस्थित करत एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबई : दर महिन्यात 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते. मात्र, आज वेतन न झाल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांना वेतन, मात्र कामगारांना वेतन का नाही, असा प्रश्न उपस्थित करत एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, एसटी कामगार संघटनांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदने पाठवून वेतन देण्याची मागणी केली आहे. 

ही बातमी वाचली का? कोरोनामुळे लगाम; दादा, भाई क्वारंटाइन

राज्यात लॉकडाऊन असल्याने अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळ सेवा देत आहे. मात्र, अशा परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवल्याचा एसटी कामगार संघटनांनी निषेध केला आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांचे वेतन देण्यात आले असताना एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देणे आवश्‍यक होते. मात्र, मंगळवारी वेतन न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. 24 मार्चपासून राज्यातील एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवासी उत्पन्नासह इतर दैनंदिन मिळणारे 22 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. त्यात एसटीमध्ये दिल्या जात असलेल्या सवलतीचे 300 कोटी रुपये राज्य सरकारकडे शिल्लक आहे. मात्र, वेतनाच्या तारखेवर हा निधी न मिळाल्याने वेतन देणे शक्‍य झाले नाही. मात्र, एसटी कामगारांचे वेतन सुमारे दोन दिवसांत होणार असल्याचे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? धक्कादायक..! लक्षणे नाहीत, मात्र, ते ठरतायेत कोरोनाचे वाहक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. कर्मचारी, अधिकारी अपुरे आहेत. त्यामुळे अद्याप शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांचेही वेतन झालेले नाही. पण, वेतन सर्वांचे दिले जाणार आहे. राज्य सरकारकडे असलेले पैसेही मिळणार आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ 

एसटीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेतन मिळाले आहे. ज्या चालक, वाहक, यांत्रिकी व अन्य कर्मचारी यांच्या पायावर एसटी उभी आहे. त्यांना वेतन मिळालेले नाही. हा भेदभाव असून, वेतन मिळण्यास विलंब होण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. 
- भाई जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस 

ही बातमी वाचली का? संपत्त्तीपेक्षा आई-वडिलांचा सन्मान महत्त्वाचा- उच्च न्यायालय

एसटीने वेतन देण्यासंबंधीचे पत्रक प्रसारित केल्यानंतर त्यास लागणा-या आर्थिक रकमेचे नियोजन आगाऊ करणे आवश्‍यक होते. मात्र, तसे केल्याचे दिसून येत नाही. खरेतर एसटी कर्मचारी अपु-या संरक्षण साधनसामग्रीत मुंबईमध्ये सेवा देत आहेत. कोणीही कर्मचारी वेतनाशिवाय वंचित राहणार नाही. असे राज्य सरकारने जाहीर करूनही वेतन मिळाले नाही. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. 
- संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघंटना 

कोरोना माहामारीत एसटी कर्मचारी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे. अशा प्रसंगात कर्मचाऱ्यांना वेतन अदा न होणे, अत्यंत असंवेदनशील बाब आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारने अदा करण्याकरिता आर्थिक मदतीसह 258 कोटींचा परतावा द्यावा व तत्काळ वेतन अदा करावे. 
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST officers pay, but workers do not get payment